धाराशिव : ‘माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही, म्हणून मी आता आंदोलन करुन कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरून जात आहे, मी फाशी घेतली आहे’, अशा शब्दांत चिठ्ठी लिहून वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विनोद त्र्यंबक गायकवाड असे मयत तरुणाचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे जाहीर सभा झाली होती. मराठा समाजासह माळी आणि मुस्लिम समाजातील बांधवांनी जरांगे यांच्या सभेला जाहीर पाठींबा दिला होता. त्यामुळे वाशी आणि परिसरातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले होते. तब्बल नऊ तास वाशी येथील मराठा समाजबांधव सभेसाठी जरांगे यांची वाट पाहत होते.
हेही वाचा : “मराठा समाजाची वाताहत कुणी केली?” भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “पुतण्याला…”
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेचा प्रभाव कायम असतानाच धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील विनोद त्रिंबक गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गायकवाड यांनी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.