हिंगोली : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट व अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले असून, पहिल्याच पावसाळ्यात छत गळू लागले आहे, तर प्लास्टरचा काही भागही कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
ठिकठिकाणची विद्युत उपकरणे, पंखे बंद असून या प्रकारामुळे नूतन इमारत चर्चेत आली. आता या प्रकरणात बांधकाम विभागाने रुद्र इलेक्ट्रिकल कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. पंचायत समितीमधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी अन्यथा जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येथील पंचायत समितीची सुमारे ११ कोटी रुपये खर्चातून इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी विद्युतीकरणाची कामे तातडीने दुरुस्ती करून उदवाहन सुरू करावे तसेच इतर कामेही तातडीने पूर्ण करावीत अन्यथा जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, बांधकाम अपूर्ण असतानाच इमारत ताब्यात कशी घेण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्युतीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कोणाचा वरददस्त आहे, याची जोरदार उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.