जालना: अवैध वाळू उपसा करणारांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी अंबड येथील तहसीलदारांनी शहागड येथील गोदावरी नदी पात्रात हवेत गोळीबार केला. रविवारी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात तहसीलदारांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या तक्रारीत अंबड तहसीलदारांनी असे म्हटले आहे, की मागील आठ महिन्यांपासून खासगी वाहनातून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रतिबंधासाठी सहकाऱ्यांसह गस्त घालत आहे.
शहागड येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तिकडे गेल्यावर १५ जण तीन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे दिसले. तहसीलदारांना पाहताच ते पळून गेले. या वेळी ट्रॅक्टरचालक इशान खान इम्रान खान (गेवराई, जिल्हा बीड) याने तहसीलदारांच्या चालकास ढकलून दिल्याने त्याच्या गुडघ्यास मार लागला.
तहसीलदारांनी ट्रॅक्टरचालकास थांबण्यास सांगितले असता त्याने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळी त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने ते बचावले.
त्यानंतर काही जण लाठ्या-काठ्या घेऊन धावून आले. त्यांनी घेराव घातल्यामुळे स्वसंरक्षणार्थ तहसीलदारांनी खासगी रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर इशान आणि अन्य तीन अनोळखी जण पळून गेले. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी वाळूसह दोन ट्रॅक्टर जप्त केले, असे तहसीलदारांनी फिर्यादीत म्हटले आहे. गोंदी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.