कराड : खासदार शरद पवारांचे निकटचे सहकारी, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या धामणी, कवरवाडी, कुसवडे, झाकडे, बनपुरी, नाटोशी आदी १० गावांतील गटाला खिंडार पडले असून, शेकडो कार्यकर्ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीरपणे दाखल झाले आहेत.

दौलतनगर-पाटण येथील शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात धामणी येथील रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी व पुजारी मंडळ, कवरवाडी, चोरगेवाडी, शेंडेवाडी, दऱ्यातील मोरेवाडी, महिंद, बनपुरी, कुसवडे पुनर्वसन झाकडे, नाटोशी या १० गावांतील पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्त्यांचे मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेत स्वागत करत विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही त्यांना दिली. दिलीप चव्हाण, मिलिंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शंभूराज म्हणाले, ‘पाटण तालुक्यात विकासकामांच्या माध्यमातून गावांचा सकारात्मक कायापालट करण्याचे काम करत आहे. सत्तेतून आपण विविध विकासकामे मार्गी लावत असल्याने विरोधी गटातील कार्यकर्ते हे आज मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ज्या विश्वासाने त्यांनी माझे नेतृत्व स्वीकारले. त्यानुसार मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला आठ महिने झालेत. आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली. सर्वसामान्य जनतेने विश्वास दाखवला. नेहमीच मताधिक्याने विजयी केले. आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री म्हणून काम करताना सातत्याने आपले लक्ष हे निवडून देणाऱ्या जनतेवर राहिले. राज्यामध्ये कितीही व्यग्र असलो, तरी जनता दरबारातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो. जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. जनहितासाठी सत्तेचा वापर केला. लोकप्रतिनिधी म्हणून कधीच गटातटाचे राजकारण केले नसल्याने सन २०२४ च्या निवडणुकीत ३५ हजारांच्या विक्रमी मतांनी निवडून आलो असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निधनानंतर सत्ता खेचून आणायला २१ वर्षे लागली. गेल्या चार पिढ्या देसाई कुटुंबाबरोबर निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामुळे हे यश मिळाल्याचे ते म्हणाले.

पाटणकरांसाठी धोक्याची घंटा

गेल्या दोन दशकात पाटणकर गटाची प्रचंड पिछेहाट होत गेली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक, राज्याचे पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) साथ सोडून अलीकडेच भाजपत प्रवेश केला. पण, पाटणकर गटाची पडझड अजूनही थांबत नसल्याने पाटणकर यांना ही धोक्याची घंटा आहे.