नांदेड : किनवट तालुक्यातील मांडवा येथील एका १९ वर्षीय तरुणाचा मेंदू एका भयंकर अपघातात मृत झाला होता. तो उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या पित्याने मनाचा मोठेपणा दाखवत त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन गरजवंतांना जीवनदान मिळाले. तर त्याचे डोळेही प्रत्यारोपित करण्यात येणार असून या माध्यमातून गरजवंतांच्या जीवनात नवप्रकाश उजळेल. सोमवार (दि. २४) हा ग्रीन काॅरीडोर अदिलाबाद (तेलंगणा राज्य) येथे यशस्वी पार पडला.

त्याचे झाले असे की, ओंकार अशोक आकुलवार (वय १९, रा. मांडवा, ता. किनवट) हा युवक लाकडी वस्तू तयार करुन घरच्या हलाखीच्या परिस्थितीला हातभार लावत असे. तर त्याचे वडील अशोक आकुलवार हे ऑटोरिक्षा चालवतात. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो अन्य दोन मित्रांसोबत शनिवार (दि. २२) मोटारसायकलने गेला होता. रात्री घरी परतत असताना बी.पी. महाविद्यालयासमोरील विसावा ढाब्याजवळ रस्त्यावर अचानक एक प्राणी आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ओंकारचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

बेशुद्ध ओंकारला तातडीने गोकुंदा (ता. किनवट) येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्याची प्रकृती नाजूक झाल्याने त्यास अदिलाबाद येथे पाठवण्यात आले. इथेही उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे नागपूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. येथे तज्ज्ञ डाॅक्टरांकरवी त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतु दोन दिवसानंतरही त्यास शुद्ध आली नाही. वैद्यकीय विविध चाचण्यांनंतर डाॅक्टरांनी त्यास ब्रेनडेड घोषित केले.

तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुण मुलगा अचानक मृत्युमुखी पडल्याच्या धक्क्यातून कुटुंब सावरलेही नसताना ओंकारच्या वडलांनी धैर्याची परिसीमा दाखवत ओंकारचे अवयव दान करण्याचा उदार निर्णय घेतला. त्यानुसार डाॅक्टरांनी तातडी दाखवत सोमवारी (दि. २४) दुपारी २ वाजता कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा बंद करुन ओंकारचे अवयव दान करण्यात आले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सुचनेनुसार ओंकारची दोन मूत्रपिंडं आणि यकृत तातडीने तीन गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे डोळेही लवकरच प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओंकारच्या कुटुंबियांच्या या धाडसी निर्णयामुळे पाच जणांचे आयुष्य नव्या आशेने उजळून निघणार आहे. या माध्यमातून ओंकार यापुढेही जीवंत असणार आहे. ओंकारच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २५) मांडवा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहीण असा परिवार आहे.