नांदेड : जनावरांच्या वाहतुकीस परवानगी मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अयुब कुरैशी (शेख) आणि त्याच्यासोबत असलेल्या राजू भिसे पाटील याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक अयुब कुरैशी बेपत्ता झाला असून, त्याच्या नांदेड येथील राहत्या घराची झडती घेतली जात आहे.

इतवारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने स्वमालकीच्या वाहनातून जनावरांची वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यास मान्यता देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अयुब कुरैशी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिसे पाटील याने पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. पोलीस उपनिरीक्षक या नात्याने जनावरांच्या वाहतुकीवर कारवाई न करता उलट त्याचा फायदा घेण्यासाठी कुरैशी आणि राजू भिसे पाटील यांनी संगनमत करून लाचेचा कट रचला, असे पोलिसांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ आणि २८ मे रोजी सापळा रचला. मात्र, आरोपींनी जाणीवपूर्वक लाच स्वीकारण्याचे टाळले. त्यामुळे लाच मागणी आणि कट रचल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक अयुब कुरैशी बेपत्ता झाला असून, त्याच्या नांदेड येथील राहत्या घराची झडती घेतली जात आहे.