नांदेड : मुखेड तालुक्याच्या हसनाळ आणि इतर काही गावांवरील दारुण नैसर्गिक आपत्तीनंतर तेथे उसळलेला जनक्षोभ थांबविण्यासाठी जिल्ह्यातील एकही राजकीय नेता पुढे आला नाही. यानिमित्ताने नांदेड जिल्ह्याचे नेतृत्वहिनत्व ठळक झाल्याचे दिसून आले.

पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा अनुभव नांदेड जिल्ह्याला नवा नाही; पण मागील काळात जिल्ह्यात तोलामोलाच्या नेत्यांची मोठी फळी होती. कुठल्याही आपत्तीमध्ये शंकरराव चव्हाणांपासून साहेबराव बारडकरांपर्यंतचे नेते-त्यांचे समर्थक बाधितांना आधार देण्यासाठी धाऊन जात असत; पण पूर्वसुरींच्या पश्चात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नेते म्हणून पाहिले जात असताना, आपत्तीच्या काळात ते परदेशात जाऊन बसले होते. त्यांच्या ठेवणीतल्या समर्थकांनी काहीच केले नाही. मुखेडच्या स्थानिक आमदारांवर लोकांचा रोष होता, तरी मुंबई दौरा अर्धवट सोडून ते आपल्या मतदारसंघात आले; पण त्यांच्यामागे एकही नेता नव्हता. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेवटी मंत्री गिरीश महाजन यांना पाठविले.

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे स्वतःला मुख्यमंत्र्यांचे खूप निकटवर्ती म्हणवून घेतात. आता त्यांचे कार्यक्षेत्र एका विधानसभा क्षेत्रापुरते असले, तरी अशोक चव्हाण यांचा प्रबळ प्रतिस्पर्धी अशी प्रतिमावर्धन करणारा हा नेता आपत्तीच्या काळात मुखेडच्या अतिबाधित भागात फिरकला नाही. खासदारकीच्या दोन्ही निवडणुकांत त्यांना वरील भागातून मोठे पाठबळ मिळाले होते. मुक्रमाबाद परिसरातील व्यंकट गोजेगावकर व इतर काही नेत्यांस चिखलीकरांनी आपल्या पक्षात आणले आहे, हे स्थानिक नेतेही गायब होते. लोकांना आवश्यक ती मदत पुरविण्याच्या बाबतीत चव्हाण-चिखलीकर यांच्या समर्थकांची असंवेदनशीलता दिसत असताना, हिंगोली जिल्ह्यात कार्यरत असलेले माजी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर व त्यांच्या मित्रमंडळाने बाधित गावांमध्ये मदतकार्य केल्याचे दिसून आले.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी स्वीय सचिव आणि आताही त्यांच्या कार्यालयात जबाबदारी सांभाळणार्या बालाजी खतगावकर यांनी गतवर्षी विधानसभा लढवताना आपणच मुखेडचे तारणहार आहोत, असे चित्र उभे केले होते. राजकीय पदार्पणात त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांनी या भागात उभे केलेले कार्यकर्ते-आणि त्यांच्या समर्थकांची फळीही अदृश्य झाल्याचे दिसले.

काही लोकप्रतिनिधी परदेशात तर काही घरीच बसलेले. त्यांच्या यंत्रणेने एक काम मात्र तत्परतेने केले. ‘नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा आणि अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांना त्वरित मदत द्या’ या मागण्यांच्या निवेदनांचा वर्षाव पहिल्या दिवसानंतर लगेचच सुरू झाला. यात भाजपाचे राज्यसभा सदस्य अजित गोपछडे यांची यंत्रणा आघाडीवर होती.

मुखेडच्या माजी आमदाराने पहिल्या दिवशी खासदारांच्या गाडीत बसून हसनाळ व त्या भागातील बाधित गावांना भेट देत आपण लोकांमध्ये आहोत, असे चित्र निर्माण केले; पण दुसर्या दिवशी माजी आमदार, त्यांचे शिक्षक बंधू गायब होते.

जून महिन्यातील अतिवृष्टीमध्ये अर्धापूर-मुदखेडच्या बागायती पट्ट्याला जबर तडाखा बसल्यानंतर अशोक चव्हाण तातडीने धावत आले होते. हा भाग त्यांच्या प्राणप्रिय भोकर मतदारसंघाचा होता. पण हिमायतनगर-किनवट, माहूर किंवा दक्षिणेकडील देगलूर-मुखेड हे सारे बाधित तालुके जिल्ह्याचाच भाग आहेत, याचा शंकररावांच्या पुत्रास विसर पडला की काय, अशी शंका वाटण्याजोगी स्थिती आहे.

लेंडी धरण शंकररावांनी सुरू केले, त्यास ४० वर्षे लोटली; पण १९९९ पासून बहुतांश काळ सत्तेत असतानाही अशोक चव्हाण यांना ‘धरण आणि पुनर्वसन’ शत-प्रतिशत पूर्ण करून घेता आले नाही हे वास्तव हसनाळमधील ५ जणांच्या मरणानंतर अधिक गहिरे झाले. तेथे प्रचंड जनक्षोभ दिसत होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासाठी हा जिल्हा नवा.

कोणत्याही स्थानिक नेत्यांची साथ नसताना त्यांनी मंगळवारी दिवसभरात प्रशासकीय कौशल्यातून लोकांचा संताप शांत केला होता. शेवटी मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासक फुंकर मारत हसनाळमधील अशांत स्थिती शांत आणि सामान्य करून रातोरात हैदराबादहून मुंबई गाठली. जिल्ह्यात तोलामोलाचा नेता असता, तर या खान्देशी मंत्र्यास येण्याची गरजच भासली नसती, असे आता म्हटले जात आहे. याच घटनेतून पालकमंत्र्यांचे नवखेपण दिसले. त्यांनी अधिकार्यांशी संपर्क राखला होता, पण स्वतःहून जिल्ह्यात येण्याची तत्परता दाखविली नाही.