महाराष्ट्रात राजकीय नाट्याचा दुसरा अंक मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण अजित पवार भाजपाला साथ देणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात होत आहेत. अशा सगळ्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक दावा केला होता. त्याबाबत प्रश्न विचारला असात सुप्रिया सुळेंनी हा मोठा दावा केला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवले जात आहेत. सुप्रिया सुळेंना जेव्हा हे विचारण्यात आलं की अजित पवार कुठे आहे? तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुम्ही त्यांच्या मागे जा, तु्म्हाला समजेल ते कुठे आहेत. अनेक समस्या आहेत, राज्यात कामं होत नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते. एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
अजित पवार भाजपात जाणार का? हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. मला याविषयीची काहीही माहिती नाही. अजितदादा हा मेहनत करणारा माणूस आहे त्यामुळे त्याच्या विषयी चर्चा होत आहेत असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा दिवसात राज्यात राजकीय भूकंप होईल असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या एक नाही दोन राजकीय भूकंप होणार आहेत एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.
अजित पवार नाराज नाहीत
सुप्रिया सुळेंनी हेदेखील सांगितलं आहे की अजित पवार नाराज नाही. संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली त्या ठिकाणी जयंत पाटील यांचं भाषण झालं नाही याचा अर्थ असा नाही की जयंत पाटील नाराज आहेत. नागपूरमध्ये वज्रमूठ सभेत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची भाषणं झाली त्यामुळे अजित पवारांचं भाषण झालं नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
अजित पवार भाजपात जाण्याच्या चर्चा का सुरू झाल्या आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदाणी प्रकरणात काँग्रेसने केलेल्या JPC च्या मागणीला विरोध दर्शवला होता. तसंच अजित पवार यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं. तसंच मोदींचा करीश्मा आहे असंही ते म्हणाले होते. तसंच EVM वरही आपला विश्वास आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. हरणारा पक्ष ईव्हीएमला दोष देत असतो. मात्र ते जनमत असतं ते मान्य करायला हवं असंही अजितदादांनी म्हटलं होतं. तसंच गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणंही टाळलं आहे. या सगळ्यामुळे अजित पवार भाजपात जातील असे अंदाज वर्तवले जात आहेत.
