परभणी : ज्याप्रमाणे खांबातून नृसिंह अवतार प्रकटला त्याप्रमाणे भाजपच्या राक्षसरूपी खलप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी भविष्यात गावागावातून ‘बॅलेट’, ‘ईव्हीएम’च्या रूपातून जनता नृसिंह अवतार धारण करील असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या सद्भावना यात्रेच्या प्रारंभी केले.
जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून या उन्हात काँग्रेसने दोन दिवस पदयात्रेचे आयोजन केले आहे. कडकडीत उन्हात सध्या ही काँग्रेसची पदयात्रा सुरू आहे. तालुक्यातील पोखर्णी (नृसिंह) या ठिकाणाहून आज रविवारी (दि.४) सकाळी निघालेली पदयात्रा दुपारी सिंगणापूर फाटा येथे पोहोचली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी, कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभराचे या पदयात्रेचे अंतर सोळा किलोमीटरचे आहे.
सध्या जाती- जातीत व धर्मा- धर्मात कलह लावले जात आहेत. समाजातला सलोखा नष्ट केला जात आहे. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवली जात आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी ही सद्भावना यात्रा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितले. सुरुवातीला मस्साजोग ते बीड अशी पदयात्रा पक्षाने काढली होती. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी या पदयात्रा काढण्यात आल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी मंत्री सतेज पाटील, नितीन राऊत, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, अनुसूचित जाती विभागाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव आदींसह या पदयात्रेत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी या ठिकाणाहून पदयात्रेला प्रारंभ झाला. महापुरुषांना अभिवादन करून राष्ट्रगीत झाल्यानंतर ही पदयात्रा परभणीच्या दिशेने निघाली.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज आणि उद्या दोन दिवस ही पदयात्रा जिल्ह्यात संवाद साधणार आहे.