अलिबाग – रायगड जिल्ह्यात सन २०२५-२६ या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ३ हजार ०४५ हेक्टरवर फळबाग लागवड होणार आहे. आंबा, काजू आणि इतर फळपिकांचा यात समावेश असणार आहे. त्यासाठी असलेले नियोजन कृषी विभागाने पूर्ण केले आहे.

फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी तसेच पडीक जमिन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात ८ हजार १७९ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. यात ६ हजार २३८ हेक्टरवर आंबा, ९८० हेक्टरवर काजू, तर ९५६ हेक्टरवर इतर फळपिकांची लागवड करण्यात आली आहे.

यावर्षी या योजने अंतर्गत ३ हजार ०४५ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. यात १ हजार ५०० हेक्टरवर आंबा, ९०० हेक्टरवर काजू, तर ६४५ हेक्टरवर इतर फळपिक लागवडीचे उद्दीष्ट असणार आहे. गेल्या वर्षी १ हजार ५८८ हेक्टरवर रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली होती. ज्याचा २ हजार ७९० बागायतदारांना लाभ मिळाला होता. यावर्षी दुप्पट क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी १५ तालुक्यांमध्ये २०७ कृषी साहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अलिबाग, रोहा,माणगाव, पेण, पनवेल, महाड, पोलादपूर पाली आणि म्हसळा या तालुक्यांवर दोनशेहून अधिक हेक्टरवर या वर्षी फळबाग लागवड केली जाणार आहे. फळबाग लागवडीसाठी ४ लाख ३४ हजार रोपांची गरज भासणार असून, जिल्ह्यात खाजगी आणि शासकीय अशा रोपवाटीका मिळून ३ लाख ७७ हजार १६१ रोपं उपलब्ध आहेत. ज्यात प्रामुख्याने आंबा, काजू, नारण आणि इतर फळपिकांचा समावेश आहे. लागवडीसाठी हवामान अनुकूल फळबाग लागवड पध्दत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे अशी माहिती रायगडच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सुपारीचा समावेश….

राज्यसरकारच्या माध्यमातून फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर योजना २०१८ पासून सुरु करण्यात आली आहे. ज्यात १६ फळपिकांचा समावेश होता. मात्र कोकणात सुपारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात असूनही या पिकाचा योजनेत समावेश नव्हता. फळबाग योजनेत सुपारी पिकाच्या समावेशासाठी बागायतदार आग्रही होते. त्यानुसार आता यात रोठा सुपारीचा समावेश करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात कोकणात सुपारी लागवडीला प्रोत्साहन मिळणण्याची शक्यता आहे.