अलिबाग: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भाताची तीन नवी वाण विकसित केली आहेत. यात कोकण संजय, कर्जत १० आणि ट्रॉम्बे कोकण खाला या वाणांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय वाण प्रसारण समितीने या तिन्ही वाणांना मान्यता दिली आहे. पुढील हंगामापासून ही तिनही वाणं वितरणात येणार आहेत. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांच्या पथका मार्फत ही तीन वाणं विकसित करण्यात आली आहेत. विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने यापुर्वीच मान्यता दिली होती. आज केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही या तिन्ही वाणांना अधिघोषित केले आहे. हेही वाचा : Nilesh Lanke : “सगळ्यांचा नाद करा पण पवारांचा नाही, नाहीतर…”, खासदार निलेश लंकेंचा राम शिंदेंना इशारा कोकण संजय हे वाण निमगरवा प्रकारातील असून, लागवडीपासून १२५ ते १३० दिवसात पिक कापणीसाठी तयार होते. हे वाण लांबट आणि बारीक दाण्याचे असून, यातून प्रती हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल उत्पादन मिळू शकणार आहे. किड आणि रोगास हे वाण मध्यम प्रतिकारक असणार आहे. कर्जत-१० हे वाण गरवा गरवा प्रकारातील आहे. ज्याची लागवड केल्या पासून साधारणपणे १४० ते १४५ दिवसात उत्पादन मिळू शकणार आहे. या वाणाची उत्पादकरा हेक्टरी ४५ ते ५५ क्विंटल आहे. हे वाण पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त असणार आहे. प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असणार आहे. हेही वाचा : रायगडातील २८ पैकी ३४ धरणे भरली, हेटवणे धरणातही ९० टक्के पाणी साठा ट्रॉम्बे कोकण खारा : हे वाण निमगरवा प्रकारातील आहे. लागवडीपासून साधारणपणे १२५ ते १३० दिवसांनी याचे उत्पादन मिळणार आहे. हे वाण लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील असून, हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळणार आहे. कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी हे वाण उपयुक्त असणार आहे. ६ ईसी पर्यंत क्षार सहन करणारा क्षमता या वाणात असणार आहे. हेही वाचा : “अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे”, सचिन वाझेचा गंभीर आरोप केंद्रीय वाण प्रसारण समितीची मान्यता मिळाल्याने आता तिन्ही भात वाणांचे बियाणे वितरण पुढील हंगामापासून सुरु होणार आहे. अशी माहिती भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. तर कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे तिन्ही नवीन वाण वरदान ठरतील असा विश्वास विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केला आहे.