संगमनेर : कोल्हार घोटी राज्यमार्गावर संगमनेर मधील कोकणगावजवळ स्लिपरकोच ट्रॅव्हल्स आणि आंब्याने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. आज, रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावरील हॉटेल भाग्यलक्ष्मी समोर झालेल्या या भीषण अपघातात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय ४६, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर) आणि अंजु प्रवीण वाल्मिकी (वय ३९, रा. पानिपत हरियाणा) या तिघांचा मृत्यू झाला. तर हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया रमेश बिर्ला, रिया अजय चावरीया (सर्व रा. मुंबई), मोहम्मद रफीक जलील शेख (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींची संख्या अधिक असून अन्य जखमींची नावे समजू शकली नाही. सर्व जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. बस मधील प्रवासी जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होते. प्रचंड आवाज आणि कोलाहल ऐकून आजूबाजूचे लोक तसेच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी आपली वाहने थांबवून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. मात्र, तिघांचा जास्त रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ४६ सी. यु. २७५४ क्रमांकाची स्लिपरकोच ट्रॅव्हल्स संगमनेरहून शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे भाविकांना घेऊन जात होती. त्यात मोठ्या संख्येने भाविक होते, जे बहुतांश बाहेरगावांहून देवदर्शनासाठी आले होते. कोकणगाव परिसरात असताना, समोरून लोणीच्या दिशेने एम. एच. १२ एन. एक्स. १४५४ क्रमांकाचा आंब्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. पावसाळा सुरू असल्याने रस्ता ओला होता. त्यामुळे, दोन्ही वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याखाली फेकली गेली. ट्रकचालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला, तर ट्रकमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघातातील वाहनांचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.