सांगली : दोन वर्षाच्या राजवीचा वाढदिवस मंगळवारी रात्री आनंदात साजरा झाला. जेवणखावण आटोपून रात्री उशिरा कोकळे (ता.कवठेमहांकाळ) सोडले‌. रस्ता पायाखालचा होता. मात्र तासगाव नजरेच्या टप्प्यात आले असतानाच राजवीसह सहा जणांची जीवनयात्रा कायमचीच थांबली. आणि राजवीचा तिसरा वाढदिवस अखेरचा ठरला. ही हकिकत आज पहाटे दीडच्या सुमारास चिंचणी (ता.तासगाव) येथे झालेल्या भीषण दुर्घटनेची. नातीचा वाढदिवस साजरा करुन घरी परतत असताना मध्यरात्री अल्टो कार कालव्यात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुलींसह सहा जण ठार झाले.

अपघातात मयत झालेल्यांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५६), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय ५२, रा. तासगाव), मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय ३३), नात दुर्वा अवधूत खराडे (वय ५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय १), सर्व रा. बुधगाव व राजवी विकास भोसले (वय २ रा. कोकळे) यांचा समावेश आहे. तर स्वप्नाली विकास भोसले या गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा : धाराशिव : आमरसातून पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील प्रकार; पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबा समवेत अल्टो (एमएच १० ए एन १४९७) गाडीतून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस झाल्यानंतर वाढदिवस झालेली आपली नात, लेक व दोन अन्य नातींसह कुटुंबीयांसमवेत तासगावला परत येत होते. राजेंद्र हे गाडी चालवत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावरील चिंचणी हद्दीत असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्या जवळ त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला व काही कळायच्या आत गाडी कालव्यात कोसळली.

हेही वाचा : वडिलांचं छत्र हरपलं, मुलानं रांगोळी, पणत्या विकल्या अन् दहावीत असे गुण मिळवले की सर्वांना अश्रू अनावर झाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालवा २५ फूटाहून अधिक खोल असल्याने याअपघाताची माहिती तात्काळ कोणाला समजली नाही. मात्र सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तासगाव पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी राजवीचा दुसरा वाढदिवस. सारे कुटुंब आनंदात होते. वाढदिवस साजरा झाला. आजोबासह सुट्टीला निघालेल्या राजवी आणि तिच्या कुटुंबावर वाढदिवसाची रात्र काळरात्र ठरली.