सांगली : ज्यांनी कधी पक्षाचे कार्यक्रम घेतले नाहीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वक्तव्ये केली त्यांनाच पक्षाने लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला असा सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उपस्थित केला. पलूस येथे भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बूथ प्रमुखांची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,दीपक शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

हेही वाचा : संजय राऊत आधी मोदींना म्हणाले औरंगजेब, आता तुलना थेट शोलेतल्या गब्बरशी, म्हणाले; “लोक त्यांना..”

यावेळी देशमुख म्हणाले, गेल्या पाच वर्षात खासदारांनी नेमके काय काम केले म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली याचे उत्तर आम्ही मतदारांना काय देणार? आम्ही पक्षाचेच काम करणार यात शंका नाही, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आदी ठिकाणी भाजपची सत्ता आली. यासाठी पक्षाचे प्रामाणिक काम केले. अन्न शिजवायचं आम्ही आणि वाढायचं दुसर्‍यांच्या ताटात असे चालणार आहे का? खासदारांनी निवडणुकीत मदत केली म्हणून विरोधकांची कामे करायची आमची मात्र डावलायची, पक्षाचा कोणताच कार्यक्रम गेल्या पाच वर्षात राबवला नाही, तरीही त्यांनाच उमेदवारी म्हणजे शिजवायचं आम्ही आणि वाढायचं दुसर्‍याच्या ताटात असे चालणार आहे का अशी खदखद यावेळी व्यक्त केली. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या नेत्यांकडे पाहून आम्ही पक्षाचे काम करत आहोत. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यापुर्वी आम्हालाही विश्‍वासात घ्यायला हवे होते. गतवेळी इच्छा असूनही पलूस-कडेगावमध्ये आम्ही शिवसेनेसाठी माघार घेतली होती. असेही ते म्हणाले.