सांगली : सांगलीतील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळविलेली ८३ लाखांची मालमत्ता चौकशीमध्ये आढळून आल्याने त्यांच्यासह पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी दिली.

निवृत्तीच्यावेळी माध्यमिक विभागाचे तत्कालिन शिक्षणाधिकारी कांबळे हे लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले होते. या प्रकरणी त्यांच्याविरूध्द ७ मे २०२२ रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असता १० लाख रूपये रोख आढळून आले होते. या रकमेबाबत त्यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नव्हता.

हेही वाचा : सांगली : अवकाळीने खराब झालेली द्राक्षे मातीआड

लाच घेत असताना सापडल्यामुळे कांबळे व त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्या मालमत्तेची खुली चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. १६ जून १९८६ ते ६ मे २०२२ या कालावधीत त्यांच्याकडे कायदेशीर मार्गाने असलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडे असलेली मालमत्ता यामध्ये तफावत आढळून आली. ज्ञात स्त्रोतापेक्षा ३६ टक्के अधिक उत्पन्न दिसून आले. यामुळे भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्यांनी ८२ लाख ९९ हजार १५२ रूपयांची मालमत्ता संपादन केल्याचे आढळून आले. या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader