सातारा : जमीन खरेदीसाठी नेण्यात येणारी २ कोटी ९५ लाखांची रोकड चालकासह चार जणांनी पुणे सातारा महामार्गावर लिंब फाटा (ता. सातारा) परिसरातून लांबवली. याची तक्रार बन्सीलाल बागाराम परमार (रा. मालाड वेस्ट, मुंबई) यांनी तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यानुसार चौघांवर विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बन्सीलाल परमार (वय ४१) हे मूळचे राजस्थान येथील असून, त्यांचा मालाड वेस्ट परिसरात सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. याचबरोबर ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. परमार यांनी हुबळी येथे दहा लाख रुपये दराने ३० गुंठे जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार त्यासाठीच्या रकमेची जुळवणी त्यांनी केली होती. दि १२ रोजी ते चालक भगवतसिंग, मांगीलाल (पूर्ण नाव पत्ता नाही), अल्ताफ ऊर्फ बाबूलाल युसूफ खान, गोविंद हिरागर यांच्यासमवेत चारचाकीतून हुबळीकडे निघाले होते. या वेळी त्यांच्याकडे २ कोटी ९५ लाखांची रोकड होती. आनेवाडी टोलनाका येथे रात्री ते आले असतानाच मालाड वेस्ट येथील घरातून परमार यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने पत्नीची तब्येत बिघडल्याचे सांगितले.

हेही वाचा : कास पठारावर पर्यटकांची गर्दी; पुन्हा वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परमार यांनी लिंबफाटा येथे गाडी थांबवत चालक भगवतसिंग व इतरांना मी येथूनच माघारी जातो, तुम्ही रोकड घेऊन हुबळी येथील ऑफिसला जा, असे सांगितले. यानंतर परमार है खासगी गाडीने पुन्हा त्याठिकाणाहून मालाड वेस्ट येथे परतले. रोकड घेऊन जाणारी चारचाकी नंतर तळबीड व इतर टोलनाके ओलांडून गेल्याचे, तसेच त्याचा टोल कपात झाल्याचे मेसेज परमार यांच्या मोबाईलवर येत होते. पत्नीस रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी भगवतसिंग याला मोबाईल केला. मात्र, तो बंद होता. वारंवार फोन करूनही तो बंद येत असल्याने, तसेच रोकड घेऊन ते हुबळी येथील ऑफिसवर पोचले नसल्याचे त्यांना समजले. शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी याची तक्रार शुक्रवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. यानुसार भगवतसिंग, मांगीलाल, अल्ताफ खान, गोविंद हिरागर यांच्यावर विश्वासघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक तांबे करीत आहेत.