सातारा : सातारा शहरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर हल्ल्याचा सोमवारी प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवून मुलास वेळीच ताब्यात घेतल्याने तिची सुटका झाली. तसेच या संतप्त जमावाने हल्लेखोर तरुणास चोप दिला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
ताब्यात घेतलेला तरूण संबंधित अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून सातत्याने त्रास देत होता. सोमवारी सायंकाळीही त्याने अशाच प्रकारे संबंधित मुलगी शाळेतून घरी येत असताना तिला अडवत त्रास देण्याचा प्रयत्न केला. या वेळी मुलीने विरोध करताच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या त्याने प्रयत्न केला.
हा प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडोओरडा केल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी संबंधित तरुणास रोखण्याचा प्रत्यन केला. मात्र त्याने या नागरिकांनाही शस्त्राचा धाक दाखवला.
या वेळी काही तरुणांनी त्याचे लक्ष विचलित करत त्याला पकडले आणि मुलीची सुटका झाली. यानंतर या संतप्त जमावाने हल्लेखोर तरुणास चांगलाच चोप दिला. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी संबंधित तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.