वाई : मागील महिन्यात भगदाड पडलेल्या ठिकाणीच निकृष्ट कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्या अभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात ( दि १६ डिसेंबर ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या ( ता वाई) हद्दीत फुटला. त्यावेळी ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्याला आलेल्या पुरामुळे या ठिकाणी निवारा घेतलेल्या ऊसतोड कामगारांची वाताहत झाली होती. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

त्यानंतर पाटबंधारे खात्याच्या अभियंता अभियांत्रिकी विभागाने दोन पोकलेन व चार डंपर यांच्या मदतीने भगदाड पडलेल्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे तसेच खाजगी ठेकेदारामार्फत काँक्रीटीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. सदर काम महिन्याभरात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सहा वाजता कालव्यातून २०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. परंतु आज सकाळी भगदाड पडलेल्या ठिकाणी भेगा पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच पुन्हा कालव्यातील पाणी बंद करण्यात आले.

हेही वाचा : “पंढरपुरात नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी”, विजय वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गळती सुरू झाल्याने धोम धरणाच्या डावा कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले असून आवर्तन लांबणीवर पडल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. या कालव्याचे आवर्तन लांबणीवर पडल्याने पिके करपून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आवर्तन सुरू करण्यासाठी असलेल्या राजकीय दबावांतून काम सुरू करावे लागले. यानंतर काम घाई गडबडीत उरकण्यात आले. त्यानंतर कालव्यात पाणी सोडण्यात आले आणि त्याच ठिकाणी पुन्हा कालव्याला गळती लागली. दरम्यान सदरचे काम घाई गडबडीत केल्याने निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पुढील आठवड्यात आवर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.