सातारा: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून एक मे राज्यभर साजरा केला जात असला तरी साताऱ्यात मात्र हा दिवस गुलमोहर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सेंट थॉमस चर्च, सदर बाजार येथे चिमुकल्यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून या महोत्सवाचे उद्घाटन झाले. गुलमोहराच्या झाडाखाली प्रसिद्ध कलाकार, कवी रंगकर्मी चित्रकार यांनी या कार्यक्रमात अनोखे रंग भरत या सोहळ्याची व्यापकता वाढवली. सातारा जिल्ह्यातील अनेक चित्रकार, कलाकार या या सोहळ्यात सहभागी होतात.
सोहेल सय्यद (फलटण) आणि राहुल सुतार (इचलकरंजी) यांनी निसर्ग चित्रे काढली. रखरखत्या उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला लाल, पिवळा, निळसर जांभळा गुलमोहर फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवाच मिळत असतो. उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व झाडे कोमेजून जातात त्यावेळी मस्तपैकी वेगवेगळ्या रंगाने फुललेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. हाच विचार घेवून साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी गुलमोहर दिन साजरा करायला सुरुवात केली.
लहान,मोठे सर्वजन गुलमोहराच्या झाडाची फुलांची छान छान चित्रे काढतात. यावेळी गाणी आणि कविता देखील म्हणल्या जातात. आज गुलमोहराची चित्रे रेखाटली गेली आणि काहींनी कविता,चारोळ्यासादर केल्या. शिल्पकार रवी कुंभार यांचे चित्रकला आणि शिल्पकला प्रात्यक्षिके आणि बालगोपाळांची चित्रकला स्पर्धा झाल्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ झाला. जैवविविधतेचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले. झाडे हे पशु पक्षांचे आश्रयस्थान आहे.
झाडेच नसतील तर मनुष्य, पशु पक्षांनी जायचे कुठे हा संदेशही देण्यात आलासकाळी गिटार वादन आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही युवकांनी गुलमोहराच्या झाडाला पाणी घालून हा दिवस साजरा केला. गुलमोहर रंगोत्सव आता आणखी बहरू लागला आहे. या उत्सवात सहभागी कलाकार कला सादर करताना कोणतंही मानधन घेत नाही. आज राज्यभरात १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे, परंतु साताऱ्यात गुलमोहर दिनाचं मात्र उत्साही कौतुक होत आहे.