सातारा : पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतुक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने होत असलेला बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरील दळणवळणाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प नव्या वर्षी कार्यान्वित होणार आहे.

पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाट हा वाहतुकीचा एक महत्वाचा टप्पा आहे. या मार्गावरील दळणवळण व वाहनांची संख्या वाढल्याने खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. तर साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतीमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला.

हेही वाचा : Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

सध्या पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घाटवाटेने जावे लागते. हे आठ किमी अंतर जाण्यास सुमारे ३५ ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. परंतु बऱ्याचदा अपघात, एखादे वाहन नादुरुस्त होणे किंवा वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील वाहतूक ठप्प होते. तसेच पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे. त्यातून येण्यासाठी साधारण १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा मार्ग सुरू करण्यात आला त्यावेळी यावरून प्रतिदिन २२ हजार असणारीं वाहनांची संख्या आता ५५ हजारांवर पोहचली आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने देखील कोंडी आणि अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते. या साऱ्यांचा विचार करतच या नव्या बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतलेले आहे.

खंबाटकीच्या नवीन बोगदयासाठी वेळे गावापासून (ता. वाई) वाण्याचीवाडी ते खंडाळा दरम्यान ६.३ किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता होत आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगदयांचे नियोजन आहे. दोन्ही बोगदयाचे ११४८ मीटरपर्यंतचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. १६ .१६ मीटर रुंद व सुमारे ९ .३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगदयांमध्ये प्रत्येकी तीन मार्गीकेचे रस्ते तयार होत असून येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगदयातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. बोगदा रस्त्यावर आपत्तकालीन रस्ताही बनवला जात आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

हेही वाचा : सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

इंधन, वेळेची बचत

खंबाटकी घाटातील या नव्या बोगद्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. स्वतंत्र आणि अधिके मार्ग तयार झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उदभवणार नाही. अपघाताचे धोकेही कमी होतील. घाटवाटेचा वापर करताना वाहनांना इंधन आणि वेळ जास्त लागतो. त्यामुळे अवजड वाहने वाहन दुरुस्ती खर्चही वाढतो. मात्र या नवीन बोगदयामुळे वाहनांचा इंधन आणि वेळेत मोठी बचत होणार आहे. वाहनांवरील खर्चही कमी होणार आहे. या मार्गावरील प्रवासू करणाऱ्या वाहनांची संख्या विचारात घेता अंदाजे १४ कोटी ६३ लाख रुपयांची खर्चात बचत होईल असे अंकित यादव प्रकल्प व्यवस्थापक यांत्रिक विभाग,राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ यांनी सांगितले.

हेही वाचा : रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोकादायक ‘एस’ वळण नाहीसे

खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणाचा धोका काढण्यासाठी सुधारित रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. शेकडो प्रवाशांचा बळी घेणारे हे वळण आता कायमचे नाहीसे होणार आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर येथून दुहेरी वाहतुक सुरू होणार आहे. शिवाय रस्ता सरळ झाल्याने अपघातांची मालिका खंडित होणार आहे.