सातारा: येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात दहा दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित फरारी आरोपी अक्षय निकम यास वाईच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने पंढरपूर येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्व वैमनस्यातून वाई औद्योगिक वसाहतीत सोमवार (दि.२४ जून ) रोजी एकावर गोळीबार झाला होता. या घटनेत अमन इस्माईल सय्यद (वय२४ रा बोपर्डी ता. वाई सद्या रा महंमदवाडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार अक्षय निकम (रविवार पेठ वाई ) व त्याच्या साथीदारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित अक्षय निकम हा फरारी झाला होता. त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या विशाल भिसे, वाहन चालक सिद्धेश सावर्डेकर व भिसेची आई जया भिसे , मयूर गाढवे या चार संशयीतांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा : तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरण: त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत, लोकसत्ताच्या वृत्तानंतर मंदिर प्रशासनाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्ह्यातील मुख्य संशयित अक्षय निकम याचा पोलिस शोध घेत होते. अक्षय हा पंढरपूर येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिस कर्मचारी प्रसाद दुदुस्कर याला खास बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, धीरज नेवसे यांनी पंढरपूर येथे जाऊन सापळा रचून अक्षय निकम याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.