सातारा : राज्यातील जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करावेत. सातारा येथील सैनिक शाळेची अभिमान वाटावा अशी कारकीर्द कायम राहीली आहे. येथील शाळेच्या कामगिरीप्रमाणे काम करण्यासाठी इतर शाळांना याचा उपयोग व्हावा यासाठी सातारा येथे राज्यातील सैनिकी शाळांची बैठक घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
सातारा येथील सैनिकी शाळेस शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी भेट दिली. राज्यातील ३८ सैनिकी शाळांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस यवतमाळचे खासदार संजय देशमुख, शिक्षण आयुक्त् सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सातारा सैनिक शाळेचे प्राचार्य के. श्रीनिवासन यांच्यासह राज्यातील ३८ सैनिकी शाळेचे प्राचार्य, पदाधिकारी, प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सैनिकी शाळांचे जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर निश्चीत प्रयत्न करेन, असे प्रतिपादन भुसे यांनी केले.
राज्यामध्ये सातारा व चंद्रपूर येथे शासकीय सैनिकी शाळा तर राज्यामध्ये सैनिकी शाळेमध्ये१२ हजार २२४ विद्यार्थी असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, सैनिकी शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती रुजविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या शाळा इतर शाळांपेक्षा वेगळ्या असून याच्यामागे देशप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जोडली आहे. सैनिका शाळा देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. हे काम करताना त्यांना अनेक आव्हानांचा तसेच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. पीपीई मॉडेल, अभ्यासक्रम, धोरणांची अंमलबाजवणी, सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र बोर्डाची मागणी, विद्यार्थ्याना प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव मिळण्यासाठीचे नियोजन असावे, कमाडंट नियुक्तीचे धोरण, स्टाफींग पॅटर्न, एनसीसी, संस्थांचे सबळीकरण यासारख्या शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठका घेऊन शाळांचे प्रश्न मार्गी लावले जातील , असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मराठी मंडळाच्या माध्यमातून सीबीएसी पॅटर्नच्या चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. मराठी हे आपले दैवत आहे. इतर माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रगीता नंतर राज्यगीत गायले पाहिजे याचीही प्रभावी अंमलबजावणी
करण्यात येणार आहे.दादा भुसे ,शालेय शिक्षणमंत्री.