सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात रविवारी जागतिक संग्रहालय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर अर्कचित्रांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर पोहोचवणारा युवा व्यंगचित्रकार ऋषिकेश सतीश उफळावीकर याच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
व्यंगचित्रात दोन प्रकार येतात. एक व्यंगचित्र अन् दुसरे म्हणजे अर्कचित्र. अर्कचित्र माणसाचं काढलेलं व्यंगात्मक चित्र असतं तर व्यंगचित्र म्हणजे प्रसंगावरून काढलेलं चित्र. कराड येथे राहणारा अवघ्या २० वर्षांचा युवा चित्रकार ऋषिकेश उफळावीकर सध्या पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने आतापर्यंत ७०० ते ८०० व्यंगचित्रे काढून कमी वयात सर्वाधिक व्यंगचित्रे काढण्याचा जागितक विक्रम नोंदवला आहे.
संग्रहालयात भरविण्यात आलेल्या या अर्कचित्र प्रदर्शनात राजकीय, सिनेसृष्टी तसेच सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या व्यक्तींची ८० चित्रे मांडण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी अनेक कलाप्रेमी सातारकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलेच्या या मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटला. हे प्रदर्शन चार दिवस सुरू राहणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले आहे.