सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचा नाही तर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार दीपक केसरकर यांच्याबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, ते सध्या ‘सायलेंट मोड’वर असले तरी ते ‘निवडणूक मोड’वर आले की समोरचे काही शिल्लक राहत नाही. केसरकर यांची शांतता वादळापूर्वीची आहे. खासदार नारायण राणे यांचा शब्द शिवसेनेसाठी अंतिम असणार आहे. त्यांच्यासारखं खरं नेतृत्व आमदार निलेश राणे करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे महायुतीचा कोणताही आराखडा असल्यास त्यांनी तो द्यावा, त्याचे स्वागत करू; मात्र, शिवसेनेला कोणीही कमी लेखू नये, असे आवाहन सामंत यांनी केले.
”केसरकर पायाने मारतात ती गाठ हाताने सुटत नाही. विरोधकांना अशी गाठ सुटणार नाही अशी खेळी केसरकर यांची असते,” असे म्हणत त्यांनी केसरकरांच्या निवडणूक कौशल्याचे कौतुक केले.
’स्वबळावर’ किंवा ‘मैत्रीपूर्ण लढतीसाठी’ तयारीचे आदेश
सामंत यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले, “महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे आणि वाईट घडू नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहेत.पण, महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची आणि स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असण्याची तयारी पाहिजे.”
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांसारखा सतर्क पदाधिकारी आणि आमदार दीपक केसरकर यांनी उभी केलेली निधीची मोठी ताकद यामुळे सिंधुदुर्गची ओळख राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळावा हा आदेशाचा आहे असे समजावे आणि शिवसेनेचा उमेदवार असणार अशी भूमिका घेऊन कामाला लागा, प्रचारास सुरुवात करा, असे आवाहन त्यांनी केले. मित्रपक्षाने शिवसेनेचा सन्मान केला पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी “हम किसी से कम नही” ही भूमिका घेतली असून, “केसरकरांनी फक्त लढ म्हणावं, आम्ही तुमच्या आशीर्वादानं लढू, विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू,” असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी आठवडाभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार असल्याची माहिती दिली.
मेळाव्याला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, हर्षद डेरे, सुनिल डुबळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, खेमराज कुडतरकर, प्रेमानंद देसाई आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी ‘शिवसेना नंबर एक’ करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले.
