सोलापूर : रिक्षा फिटनेससाठी बेसुमार वाढविलेली दंडाची रक्कम रद्द करावी, या मागणीसाठी बुधवारी सोलापुरात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. रिक्षाचालकांना रिक्षा फिटनेससाठी दररोज ५० रूपये दंड ठोठावणे म्हणजे जिझिया कर वसुली आहे. या प्रश्नावर शासनाने संवेदनशीलता दाखवून रिक्षाचालकांना न्याय द्यावा. अन्यथा येत्या १६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा मोर्च्यातून देण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून मोर्च्याला प्रारंभ झाला. सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम, वाहतूकदार संघटनेचे रियाज सय्यद, भारतीय मजदूर युनियनचे प्रकाश आळंदकर, अजीज खान, कॉ. सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे आदींनी या मोर्च्याचे नेतृत्व केले. या मोर्च्यात हजारो रिक्षाचालक सहभागी झाले होते. हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे आॕनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी २१ मे २०२४ रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरु झाल्यानंतर रिक्षा फिटनेससाठी असलेली सहाशे रूपये दंडाची रक्कम विलंब शुल्कासह बेसुमार वाढल्याचे समोर आले. तेव्हा रिक्षाचालकांना धक्का बसला. चालकांना माहित झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रश्नावर सर्व रिक्षाचालक संघटना एकवटल्या असून ही अन्यायी दंडाची वाढीव आकारणी रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. हेही वाचा : खुशखबर! माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ‘या’ तारखेनंतरही सुरू राहणार; आदिती तटकरेंची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नरसय्या आडम यांनी घणाघाती भाषणात शासनाच्या अन्यायी धोरणावर हल्लाबोल केला. एकीकडे बड्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देताना दुसरीकडे दररोज १०-१२ तास मेहनत करून रिक्षा व्यवसाय करणा-या चालकांवर अन्यायाचा वरवंटा चालविला जात आहे. जोडीला वाहतूक पोलिसांचा जाच सोसावा लागतो. वाहतूक पोलीस केव्हा रिक्षाचे छायाचित्र टिपतील आणि केव्हा दंडाची पावती पाठवतील, याचा नेम नाही. यात रिक्षाचालक भरडले जात आहेत, अशी व्यथा त्यांनी मांडली. यावेळी प्रकाश आळंदकर, रियाज सय्यद, अजीज खान, प्रहार जनशक्ती पक्षा अजित कुलकर्णी, जमीर शेख व सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख यांची भाषणे झाली.