सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात पाच वर्षात तब्बल एक लाख कोटी रूपयांचा विकास निधी आणल्याचा दावा करणारे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समवेत खासदार निंबाळकर हे माढा तालुक्यात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चक्क गाजरांचा पाऊस पाडून त्यांचा निषेध करण्यात आला. तथापि, असा प्रकार घडलाच नाही, असा दावा खासदार निंबाळकर यांनी केला आहे.

या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात पोलीस बंदोबस्तात निघालेल्या खासदार निंबाळकर यांच्या मोटारीवर काही तरूण गाजरे टाकताना दिसतात. माढा तालुक्यात रांझणी गावाजवळ हा प्रकार घडला. रांझणी-आलेगाव-गार अकोले-टाकळी-आढेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे हे आले होते. त्यांच्या सोबत पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही होती. परंतु त्यांच्या वाहनांवर भाजपच्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी तीन ते चार क्विंटल गाजरे फेकली. त्यामुळे रस्त्यावर गाजरांचा अक्षरशः सडा पडला होता.

Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…
MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Vijay Vadettiwar
“शिंदे गटाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, त्यांचे निम्मे आमदार…”; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

हेही वाचा : ‘देवेंद्र फडणवीसांनी मला आत टाकावेच, मग दाखवतो’, मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आव्हान…

हे आंदोलन करणारे गार अकोल्याचे भाजपचे कार्यकर्ते सतीश सुरेश केचे यांनी आपली भूमिका मांडली. खासदार निंबाळकर हे नेहमीच खोटी आश्वासने देतात आणि खोटा दावा करून केवळ विकासाचे गाजर दाखवितात. त्यांच्या वागण्याने आणि खोट्या बोलण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केचे यांनी केला. खासदार निंबाळकर यांची केवळ विकासाचे गाजर दाखविण्याच्या खोट्या वृत्तीचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या वाहनांवर गाजरांचा पाऊस पाडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात खासदार निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आंदोलनाचा प्रकार घडलाच नाही. आपला माढा तालुक्यातील दौरा निर्विघ्नपणे पार पडल्याचा दावा केला.