सोलापूर : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा समीप आला असताना सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले असून उद्या सोमवारी दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे मंदिरांसह मशिदी, दर्गाह आणि गिरिजाघरांच्या साफसफाईचे अभियान राबविण्यात आले आहे.

सोलापूर शहरात ८१ मंदिरांसह १५ मशिदी आणि ६ गिरिजाघरांची साफसफाई करण्यात आली आहे. अकलूजमध्ये ग्रामदैवत अकलाई मंदिरासह तेथील प्रसिध्द सुफी संत राजा बागसवार दर्गाह परिसराचीही साफसफाई करण्यात आली. भाजपचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या अभियानात हिंदू-मुस्लीम भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राजा बागसवार साहेबांच्या समाधीवर फुलांची चादर अर्पण केली.

हेही वाचा : कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभिकरण होणार, पाच कोटींच्या विकास कामांचे आदिती तटकरे यांच्या हस्ते भुमिपूजन

अकलूजजवळ मोरोची गावात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मणासह विठ्ठल-रूक्मिणी, गणपती व अन्य देवादिकांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखरावर कळसारोहण झाल्यानंतर हेलिकाॅप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मदिर परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला असून तेथे प्रवचनासह अन्य धार्मिक विधी संपन्न होत आहेत. महिला एकत्र येऊन मंदिरासाठी फुलांचे माळा तयार करताना ‘श्रीराम जय जय श्रीराम’ नामासह ‘रघुपती राघव राम, पतित पावन सीताराम’ हे महात्मा गांधीजींचे आवडते भजन आळवत होत्या. सायंकाळी श्रीरामासह सर्व देवतांच्या मूर्तींची रथातून शोभायात्रा काढण्यात आली. या उत्सवात संपूर्ण गाव लोटला आहे. असा ‘राममय’ माहोल गावागावातून दिसून येतो.

हेही वाचा : तुळजापूर : शाकंभरी नवरात्रोत्सवात चौथ्या माळेला मुरली अलंकार महापुजा; अभिषेक पूजा, कुलधर्म कुलाचार व दर्शनासाठी भाविकांची गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर शहरात बहुसंख्य रस्त्यांवर कापडी भगव्या पताकांसह भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. नेत्रदीपक विद्युत रोषणाईने अनेक मंदिरे उजळून निघाली आहेत. तर काही नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपापल्या घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. श्रीरामाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल फलक उभारण्यात आले आहेत. मधला मारूती मंदिर परिसरातील बाजारपेठा धार्मिक पूजा साहित्य खरेदीसाठी फुलून गेल्या असून भगवे ध्वज, श्रीरामाच्या प्रतिमा, केळीचे खुंट तसेच फटाके आणि मिठाई खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती. तेथील वातावरणात दसरा-दिवाळीसारखा उत्साह दिसून आला. घराच्या दरवाजासमोर तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यासाठी मातीच्या दिव्यांना दिवाळीसारखी मागणी वाढली आहे. एवढेच नव्हे तर आकाशदिवे खरेदीसाठी उत्साह दिसून आला.