सोलापूर : तीन दिवसांपूर्वी ४५ अंशांच्या घरात गेलेले सोलापूरचे तापमान रविवारी तिसऱ्या दिवशी चार अंशांनी घटले. त्यामुळे सोलापूरकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. रविवारी तापमानाचा पारा ४०.६ अंश सेल्सिअस इतका नोंद झाला.‌

मागील एप्रिल महिन्यात तब्बल २५ दिवस तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत वाढले होते. त्यानंतर मे महिना उजाडताच तापमानात पुन्हा वाढ होत गेल्याने सोलापूरकर आणखी बेचैन झाले आहेत. १ हे रोजी तापमान ४४.१ तर २ हे रोजी त्यात आणखी वाढ होऊन ४४.७ अंश म्हणजेच तापमान ४५ अंशांच्या घरात पोहोचले होते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दाहकता सोसावी लागत असताना दुसरीकडे असह्य रणरणत्या उन्हात रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांनाही उष्णतेची झळ बसली आणि त्यात दोन मोटारींसह तीन वाहने जळाल्याच्या घटनाही घडल्या.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात दिलासादायक बदल दिसत असून वारे चांगले खेळू लागले आहे. रात्रीही वारे सुटत आहेत. त्यामुळे उष्मा किंचित कमी झाला आहे. काल शनिवारी तापमानात घट होऊन ४२ अंशांपर्यंत तापमान मोजण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तापमानात आणखी घट झाल्याचे दिसून आले. ४०.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान मोजण्यात आले. म्हणजे तीन दिवसांत तापमानात चार अंशांनी घट झाल्याने सोलापूरकरांना सुखद दिलासा मिळाला आहे.‌

तथापि, तापमानात काहीशी घट झाली तरीही नागरिकांनी दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हाचे चटके सहन करीत घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे, उन्हात फिरताना पुरेशी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.