महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर निशाणा तर साधलाच. तसंच येत्या काळात महाविकास आघाडीची रणनीती कशी असेल? हेदेखील सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले तो विषय सोडून द्या. यानंतर अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक प्रश्न विचारला गेला. त्यावर पुढच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार

अजित पवार यांना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. अमित शाह हे नाव घेतलंत. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन काहीही बोलला नाहीत. त्यांच्याविषयी सॉफ्टकॉर्नर आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुमची सूचना लक्षात घेतली. पुढच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन बोलणार. मला जर बोलायची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार. तुमची सूचना अजित पवारने स्वीकारली. नागपूरच्या सभेत मला जर बोलायची संधी दिली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मी बोलेन.” अजित पवारांनी हे उत्तर देताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

पुण्यातल्या पोटनिवडणुकीच्या चर्चेवरून भाजपावर टीका

“महाविकास आघाडीचे नेते त्याबाबतचा निर्णय घेतील. मात्र माझी विनंती आहे की आत्ताच त्या गोष्टीची चर्चा मुळीच करू नका. आजच मला चंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता की ७ एप्रिलला गिरीश बापट यांची श्रद्धांजली सभा आहे. मला पहिला राग इतका आला, कारण आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळी अस्थि विसर्जनही झालं नव्हतं. काय आपण? निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहींचे. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. सगळंच सोडलं का? तुमच्या-आमच्या घरात अशी दुःखद घटना घडली ततर मणूस १३-१४ दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसलं तर बिघडलं कुठे? सारखं कोण उमेदवार देणार?, कोण काय करणार? भावी खासदार म्हणून काहींचे पोस्टर लागलेत अरे जरा लाज वाटली पाहिजे. कुठे गुडघ्याला बाशिंग बांधून निघालात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.