वसई : भारत देशात राहून सुद्धा येथील संस्कृती व धर्म याविषयीची माहिती नाही, अशा लोकांकडून सध्या हिंदू विरोधी विविध प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. जे हिंदू विरोधी बोलतील त्यांचे समूळ उच्चाटन करू, असे प्रतिपादन भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वसईत केले. वसईत प्रखर राष्ट्र चेतना सभेच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
रविवारी वसईत संत धर्म सभा, वसई यांच्या तर्फे प्रखर राष्ट्र चेतना सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेपूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वसईतील पत्रकारांशी संवाद साधला. भारत हा देश आहे मात्र इंग्रजांनी त्याचे इंडिया करून देशाला बदनाम करण्याचे काम केले आहे. भारत हे सनातन राष्ट्र आहे आणि सनातन धर्म आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जे हिंदू विरोधी वक्तव्य करून धार्मिक भावना भडकविण्याचे काम करीत आहे. काँग्रेसने सुध्दा देशाला एकत्रित ठेवण्याऐवजी देश विखुरण्याचे काम केले असल्याचा आरोप करीत साध्वी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने सतत जातीचे राजकारण केले आहे. भाजपा जातीचे राजकारण करीत नसून नवीन भारत हा विकसित भारत बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुद्धा पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? भरत गोगावले म्हणाले…
जे कोणी हिंदू विरोधी व हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करीत असतील त्यांचे समूळ उच्चाटन केले जाईल. लव्ह जिहाद सारख्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविले जात आहे. याशिवाय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यासाठी मुलींनीसुद्धा आपल्या आत्मरक्षणासाठी शस्त्र जवळ बाळगले तर काहीच चुकीचे नाही, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ईडीची अनेक मोठ्या राजकीय नेत्यांवर कारवाई सुरू होती. मात्र भाजपा मध्ये आल्यानंतर ते निर्दोष कसे होतात? असा प्रश्न काही पत्रकारांनी साध्वी यांना विचारला. त्याला उत्तर देताना केवळ भाजपात आले म्हणून त्यांच्यावरील कारवाई थांबली असे नसून त्यांच्या चौकशी नंतर त्यांना निर्दोष सोडले आहे. ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर त्यानुसार कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज वसईत सनातन धर्म व राष्ट्राविषयीची चेतना जगविण्यासाठी आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.