लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : माघी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या खजिन्यात जवळपास ३ कोटी ३ लाख इतके उत्पन्न विविध माध्यमातून जमा झाले आहे. गेल्या माघी यात्रेच्या तुलनेत यंदा समितीच्या उत्पन्नात घट झाली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे. यंदा माघी एकादशीला जवळपास साडेचार लाख भाविक दाखल झाले होते.

येथील सावळ्या विठूराया चरणी मुक्त हस्ताने दान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोने, चांदी, दागिने, रोख रक्कम, अन्नछत्रला अशा अनेक बाबींवर दानशूर पुढे येत आहेत. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी माघी यात्रा नुकतीच झाली. दि ३० जानेवारी (माघ शुद्ध १ ) ते दि. १२ फेब्रुवारी (माघ शुद्ध १५ ) या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमातून जवळपास ३ कोटी ३ लाख ६ हजार ८१६ इतके उत्पन्न सोने, चांदी, दागिने, लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मिळाले आहे. गेल्या वर्षी माघी यात्रेच्या कालावधीत समितीला ३ कोटी ५० लाख २२ हजार ५१९ रुपये इतके उत्पन्न विविध माध्यमांतून मिळाले होते. या तुलनेत यंदा ४७ लाख १५ हजार ७०३ रुपये इतकी घट झाली असल्याची माहिती व्यवस्थापक श्रोत्री यांनी दिली.

जरी माघी यात्रेत उत्पन्न कमी झाले असले तरी एरीवारी, सणाला तसेच मोठ्या यात्रेच्या काळात देवाच्या पुढे सढळ हाताने दान देत आहेत. या मिळालेल्या उत्पन्नातून मंदिर समिती दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते, असे असले तरी यंदाही सावळ्या विठुरायाच्या चरणी दान देताना हात आखडता घेतला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे मिळाले समितीला उत्पन्न

२०२४२०२५
श्री चरणी३२,३३,४२०३२,४७,७७४
देणगी ८०,३४,१२८८९,०२,७९८
लाडू प्रसाद विक्री४०,८१,००० ३९,४४,०००
भक्त निवास३६,८३,९६९५०,९०,७२१
पूजा ८,८८,८००७,२८,६००
हुंडा पेटी८६,४८,१५२१,१५,९८,७३९
सोने, चांदी १०,३९,७०७५,१५,८०५
फोटो, जमा पावती ई.६,९७,६४०९,९४,०८२
एकूण३,०३,०६,८१६३,५०,२२,५१९