प्राप्तिकर विभागाने नुकतेच महाराष्ट्रातील पुणे आणि ठाणे येथील युनिकॉर्न स्टार्टअप समूहावर छापे टाकले होते, त्यानंतर विभागाने सुमारे २२४  कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघडकीस आणली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. ९ मार्च रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील २३ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, असं कर मंडळाने रविवारी एक निवेदन जारी करत सांगितलं.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्टार्ट अप कंपनी बांधकाम साहित्याच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीत गुंतलेली आहे आणि त्यांची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींहून अधिक आहे. या कंपनीचा व्यवसाय संपूर्ण भारतामध्ये आहे. आतापर्यंत १ कोटी रुपये बेहिशेबी रोकड आणि २२ लाख किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले.

या कंपनीने बोगस खरेदी केल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. तसेच त्यांनी प्रचंड बेहिशेबी रोख रुपये खर्च केले आणि संपत्ती खरेदी केली आहे. या सर्वांची किंमत ४०० कोटींपेक्षा जास्त आहे. दरम्यान, समूहाच्या संचालकांसमोर हे सर्व पुरावे ठेवून चौकशी त्यांची करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी २२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा खुलासा केला आहे. त्यानंतर त्यांनी थकबाकी कर भरण्याची ऑफर दिली आहे, असंही निवेदनात म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या समुहाने मॉरिशसमधून खूप जास्त प्रीमियमवर शेअर्स देऊन परकीय निधी जमा केल्याचेही तपासात उघड झाले आहे.