जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील प्रमुख चारही पक्षांचे उमेदवार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) रडावर येण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस, शिर्डी), खासदार दिलीप गांधी (भाजप, नगर) आणि राजीव राजळे (राष्ट्रवादी, नगर) या तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या स्थावर व जंगम मालमत्तेत मागच्या लोकसभा निवडणुकीच्या (सन २००९) तुलनेत दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली असून नव्या नियमानुसार अशा उमेदवारांचा लाल निशाणी यादीत (रेड फ्लॅग्ज) समावेश होणार असून त्यांची संपत्ती आणि करदायीत्व तपासण्यात येणार आहे. राज्यातील प्रमुख पक्षांचे अनेक उमेदवारही या यादीत समाविष्ठ होण्याची चिन्हे आहेत.
राजळे गेल्या वेळी काँग्रेसचे बंडखोर म्हणून अपक्ष रिंगणात उतरले होते, आता ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या मालमत्तेत मागच्या पाच वर्षांत काही पटींनी वाढ झाली आहे, हे त्यांच्या दोन निवडणुकांमधील संपत्तीच्या विवरणपत्रावरून स्पष्ट होते. गेल्या वेळी एकटे वाकचौरे व गांधी कोटीच्या क्लबमध्ये होते, राजळे कोटीच्या आतच होते. या निवडणुकीत मात्र तिन्ही उमेदवारांची संपत्ती साधारणपणे सारखीच म्हणजे सहा कोटींच्या वर गेली असून आता तिघेही कोटय़धीश झाले आहेत. या तिघांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल चार ते पाच कोटी रूपयांची वाढ झाली आहे. त्याचे प्रमाणे ४ ते १२ पट आहे. मात्र तिघांकडेही पॅनकार्ड आहे.
उमेदवारांची संपत्ती आणि करदायित्व याबाबत केंद्र सरकारने यंदा कडक पाऊले उचलली असून पाच कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे, मात्र पॅनकार्ड नाही अशा उमेदवारांवर आयकर विभागासह निवडणूक आयोगाचीही करडी नजर आहे. पाच वर्षांत संपत्तीमध्ये दोन कोटींपेक्षा अधिक वाढ झालेल्या उमेदवारांची संपत्ती आणि करदायित्व तपासण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कलमांची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच अशा उमेदवारांच्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रांची छाननी होणार आहे.
नगर जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीन पक्षांच्या उमेदवारंच्या संपत्तीत मागच्या पाच वर्षांत दोन कोटींपेक्षा अधिक वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत वाकचौरे यांची मालमत्ता १ कोटी ७८ लाख ६० हजार ५१५ रूपयांची होती. त्यात यंदा तब्बल ४ कोटी ८० लाख १३ हजार ३८२ रूपयांची वाढ झाली असून हे प्रमाण सुमारे चौपट आहे. या निवडणुकीत त्यांची मालमत्ता ६ कोटी ५८ लाख ७३ हजार रूपयांची आहे. मागच्या निवडणुकीत गांधी यांची मालमत्ता १ कोटी १४ लाख ९ हजार ३१६ होती, ती आता ६ कोटी ६० लाख ५७ हजार १२५ रूपयांवर पोहोचली असून पाच वर्षांत त्यामध्ये ५ कोटी ५४ लाख ४७ हजार रूपयांची वाढ झाली असून हे प्रमाण सुमारे पाचपट आहे. राजळे यांची मालमत्ता पाच वर्षांत तब्बल दहापट वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडे ६१ लाख ६५ हजार रूपयांची मालमत्ता होती, ती आता तब्बल ६ कोटी २६ लाख ५९ हजार रूपयांवर गेली आहे. शिवाय या तिघांवर कमी-अधिक कर्जही आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात यंदा तेरा उमेदवार आहेत. त्यात माजी न्यायमुर्ती बी. जे. कोळसे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी रूपयांची संपत्ती आहे. मात्र आपण सर्वात श्रीमंत आहोत या वक्तव्याला त्यांचा आक्षेप आहे. कधी काळी घेतलेल्या जागा, फ्लॅट व शेअर्सची किंमत कालांतराने वाढल्याने त्याची किंमती तेवढी दिसते असा खुलासा त्यांनी केला. नगर मतदारसंघातीलच आप आदमीच्या उमेदवार, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याकडे ३ कोटी ५३ लाख रूपयांची संपत्ती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याकडे ३ कोटी ७९ लाख रूपयांची संपत्ती आहे. याच मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले यांच्याकडे ३७ लाखांची संपत्ती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2014 रोजी प्रकाशित
वाकचौरे, गांधी, राजळेंचा समावेश संपत्तीत २ कोटींपेक्षा अधिक वाढ
जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील प्रमुख चारही पक्षांचे उमेदवार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) रडावर येण्याची शक्यता आहे.
First published on: 07-04-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase property of bhausaheb wakchaure dilip gandhi rajeev rajale