रायगड जिल्ह्य़ात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य समारोह अलिबागच्या पोलीस परेड मैदानात पार पडला. रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एच के जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी तथा स्वातंत्र्यसैनिकही उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.    
यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. चोरांचा पाठलाग करून जेरबंद करताना जखमी झालेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक डी. ए. सोनवणे, साहाय्यक फौजदार जे. टी. वाटवे, साहाय्यक फौजदार एच. डी. पाटील, आर. ए. दुमाडा, ए. एल. देशमुख,  एम. डी. दरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ए. एम. म्हात्रे, एस. वाय. पाटील, एस. बी. जाधव आणि एस. एस. कावजी या पोलीस कर्मचाऱ्यांचाही पालमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सागरी सुरक्षेबाबत जनजागृती अभियानाअंतर्गत रायगड पोलिसांनी एक स्लोगन स्पर्धा घेतली होती. या स्लोगन स्पर्धेतील आठ विजेत्यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले; तर पूर्व माध्यमिक, माध्यमिक आणि प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कृषी विभागातील विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
 भारताचा ६६ वा स्वातंत्र दिन महाड तालुक्यामध्ये सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त महाड तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय ध्वजारोहण समारंभाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय ध्वजारोहण महाडचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड पोलिसांतर्फे ध्वजाला मानवंदना देण्यात आली. या वेळी तहसीलदार प्रियांका कांबळे नगराध्यक्षा, नूपुर जोशी मुख्याधिकारी दीपक झिंजाड उपविभागीय कृषी अधिकारी खरनार, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, महाड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माधव मुंदडा, ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी भाऊ लकेश्री, रामभाई शेट, नगरसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑगस्ट क्रांतिदिनाच्या दिवशी महाड तालुक्यातील १९४२ व्या स्वातंत्र्य लढय़ामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊ लकेश्री यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्वातंत्रदिनी श्री लकेश्री यांचा प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराप्रमाणे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
चैतन्य सेवा संस्थेतर्फे भारतमाता पूजन सोहळा
महाड शहरामध्ये सेवाभावी चैतन्य सेवा संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे या वर्षी भारतमाता पूजनाचा सोहळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतमातेचे पूजन शिवभक्त सुरेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील शिवाजी चौकामध्ये उभारण्यात आलेल्या सभामंडपामध्ये भारतमातेचे विधिवत पूजन आज सकाळी ९.३० वाजता शिवभक्त सुरेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्त संस्थेतर्फे भारताचा ध्वज असलेल्या बिल्ल्यांचे वाटप करण्यात आले.
नागरिकांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष चेतन उतेकर म्हणाले, गेली अनेक वष्रे भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण होते त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ांमध्ये ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांना अभिवादन करण्यात येते. या प्रसंगी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.