इंडिया बूल्स (सध्याचे नाव रतन इंडिया) ही रॉबर्ट वधेरा यांच्याशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीच्या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची बागायत जमीन बळजबरीने संपादीत करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशभर दौरे करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सिन्नर तालुक्यात फिरकत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला. शेतकऱ्यांप्रती पुळका दाखविणाऱ्या राहुल यांनी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी आंदोलन करावे, असे आव्हान उभयतांनी दिले.
बुधवारी खा. शेट्टी व खोत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ९ जूनपासून नाशिक जिल्ह्यात भूमी बचाव आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांना वेठीस धरून विविध प्रयोजनांसाठी शेतजमिनी संपादीत केल्या जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये तर मोबदलाही दिला गेलेला नाही. बळजबरीने होणारे हे भूसंपादन रोखण्यासाठी संघटनेने या आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे खा. शेट्टी यांनी नमूद केले. इंडिया बूल्स कंपनीच्या रेल्वेोर्गासाठी याच पध्दतीने भूसंपादन करण्यात आले. इंडिया बूल्स ही शासकीय कंपनी नाही. ती गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्याशी संबंधित आहे. सध्या राहूल गांधी देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देत आहे. त्यांनी सिन्नरमधील बाधीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आव्हान खोत यांनी दिले. सिन्नरच्या शेतकऱ्यांचे नेतृत्व केल्यास स्वाभिमानी संघटना देशात त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करेल, असेही त्यांनी नमूद केले.