scorecardresearch

आपण भारतीय हाच धर्म – नाना पाटेकर

शतकोमहोत्सवी सांगता सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

Nana patekar, नाना पाटेकर
अभिनेता नाना पाटेकर

मला धर्म मान्य नाही, भारत धर्मनिरपेक्ष म्हणता तर प्रत्येक फॉर्मवर धर्म जातीचा कॉलम काढून का टाकत नाही? असा प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी करून आपण भारतीय असून, आपला धर्म व जात ही भारतीय आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘नाम’ संस्थेची शाखा सिंधुदुर्गात सुरू करून कोकणातील शेतकऱ्यांनादेखील साथ देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आचरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोमहोत्सवी सांगता सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. आपण जात, धर्म मानत नाही. आपण भारतीय आहोत, याचाच अभिमान असल्याचेही तो म्हणाला.
या वेळी धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांनी नाना पाटेकर यांचा प्रथम सन्मान केला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप परब, शशांक मिराशी यांनी नाना पाटेकर यांचा प्रथम सन्मान केला.
या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप परब, शशांक मिराशी, अशोक गावकर, पी. जी. मिराशी, डॉ. रानडे, मुख्याध्यापक बाजेल फर्नाडिस आदी उपस्थित होते.
माणसामध्ये खलनायकही असतो आणि नायकही असतो. खलनायक व्हायचे की नायक व्हायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. नायक होऊन आपल्यातील माणुसकी जगवण्याचा प्रयत्न केला तर माणूस म्हणून जीवन जगल्याचे समाधान मिळेल असे ‘नाम’ फाऊंडेशनचे संस्थापक व अभिनेता नाना पाटेकर म्हणाले.
विदर्भातील दुष्काळी स्थिती आणि आत्महत्या पाहून मन हेलावून गेले. मकरंद अनासपुरेशी संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. त्यातूनच ‘नाम’ फाऊंडेशनची स्थापना झाली. कोकणातही नाम संस्था काम करणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्गात शाखा स्थापनेचा मनोदय पाटेकर यांनी व्यक्त केला.
भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपण स्वातंत्र झालो असे कसे म्हणायचे असा सवाल नाना पाटेकर यांनी करून आपल्याकडे मूठभर असेल तर चिमूटभर दुसऱ्याला देण्याची दानत हवी. ती जर नसेल तर जगण्याला अर्थ राहत नाही, असे नाना पाटेकर म्हणाला.
या वेळी नाना म्हणाले, १४ फेब्रुवारी ही तारीख व्हॅलेंटाइन डे म्हणून लक्षात राहते. मात्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना ज्या दिवशी फाशी देण्यात आली ते आपल्या लक्षात राहत नाही. आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करतो ते थांबले तरच भारतीय संस्कृतीची जोपासना होईल. माणसात देव शोधा. आपल्या हृदयात देव असतो. आपल्या कामाला देव माना, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत. या जगात येताना आपण हे धर्म घेऊन आलो होतो का? सर्व धर्मातील श्लोक, कलम याचा अर्थ एक आहे. मुळात धर्म मला मान्य नाही. आपण भारतीय असून धर्म व जात भारतीय आहे असे नाना पाटेकर म्हणाले.
या वेळी नाना पाटेकर यांनी कोकणातील माणूस समाधानी असल्याचे सांगत नाम संस्थेची माहिती दिली. या वेळी नाना म्हणाले, मुरुड किनाऱ्यावर समुद्रीस्नानाचा आनंद लुटताना पुणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शिक्षण विभागाने सहलीवर र्निबध घातले. हा निर्णय चुकीचा आहे. गडकिल्ले, इतिहास अशा पर्यटनस्थळी सहली नेण्याचे र्निबध आणून पुस्तकी ज्ञानापेक्षा शिक्षणावर र्निबध आणणे योग्य ठरणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-02-2016 at 02:57 IST

संबंधित बातम्या