राज्यसभा निवडणुकीसाठी माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे पिता छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले होते. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात अंतर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे असे म्हटले होते. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरुन याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त इतिहासाचे दाखले देत संभाजीराजे छत्रपतींनी सूचक वक्तव्ये केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी त्यांनी बाप लेकात भांडण लावण्यात आली असा उल्लेख संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे.
“महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सगळ्या महाराष्ट्रात मी तुम्हा सर्वांना भेटायला येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशीच छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. देशाचे पहिले स्वातंत्र्य १९४७ साली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्थापित मावळ्यांना एकत्र केले आणि स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत असताना शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रस्थापित व्यवस्था याला सुरुंग लावणार हे त्यावेळी लोकांना कळाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक पातशाही होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी त्यांनी बाप लेकात भांडण लावण्याचे ठरवले. भांडण लावताना छत्रपती शिवाजी महाराजही म्हणाले असतील की शहाराजेंवर किती दबाव आणला गेला. घराण्यात फूट पाडण्यापर्यंत पातशाहीतील आणि प्रस्थापित लोक गेले होते,” असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
“मी काय माझे सांगत नाही जे लिहून आणले आहे ते वाचत आहे. आदिलशाहीने शहाजीराजेंना पत्र लिहिले होते. त्यामध्ये तुमच्या मुलाला घरात थांबवा नाहीतर आमच्यात सामील करुन घ्या म्हटले. यावर शहाजीराजेंनी उत्तर दिले होते. हा माझा मुलगा आहे पण माझे काही ऐकत नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी तुमच्यासोबत प्रामाणिक आहे, असे शहाजीराजेंनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजेंना काही सांगत नसतील का? मग ते असं का म्हणाले हे मी सांगणार नाही ते तुम्हीच शोधून काढा,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले होते. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता असेही शाहू महाराज यांनी म्हटले.