Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. त्यानंतर अनिल अंबानी यांना समन्सही बजावलं होतं. दरम्यान, आता अनिल अंबानी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी यांना ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलेले आहेत. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
२०१७ ते १९ या काळात येस बँकेकडून रिलायन्स अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रमाणात एकूण ३ हजार कोटींची कर्जे वितरीत करण्यात आले होते. पण या सगळ्या व्यवहारात बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. ही कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमोटर्सला लाच दिली गेल्याचा संशय ईडीला आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीकडून तपास केला जात आहे.
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे या आरोपाच्या पार्श्वभूमीवर देखील या सर्व व्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आल्याच्या आरोपाप्रकरणी अनिल अंबानी यांची चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
ईडीने ३५ ठिकाणी केली होती छापेमारी
मुंबईत आठवड्याभरापूर्वी जवळपास ३५ ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. ही ठिकाणं मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्याशी निगडित होती. या ठिकाणी सविस्तर चौकशी केल्यानंतर आता ईडीने अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
लूकआऊट नोटीस जारी
उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात आता ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उद्योगपती अनिल अंबानी यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही.