Eknath Shinde मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी दोन दिवस जोरदार पाऊस कोसळतो आहे.अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.
ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकलसेवा पूर्णपणे बंद
मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून चुनाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच बाहेर पडा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मुंबई आणि उपनगरांमध्ये पाणी भरलं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. सहा तासांमध्ये २०० मिमि आणि २४ तासांत ३०० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मिठी नदीलाही पूर आला आहे. महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. ५२५ पंप सुरु करण्यात आले आहेत. १० मिनी पंपिंग स्टेशन आहेत. होल्डिंग पाँडही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिठी नदीला आलेल्या पुराचा धोका ओळखून ३०० जणांचं आपण स्थलांतर केलं आहे. मुंबईत जीवितहानी होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून सगळेच फिल्डवर काम करत आहेत. सहा पंपिंग स्टेशनही काम करत आहेत. कमी वेळात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मुंबईत लोकल सेवा ठप्प
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मंगळवार सकाळपासून रेंगाळत धावणारी रेल्वे सेवा साडेअकरानंतर ठप्प झाली. रुळावंर पाणी साचल्याने हार्बर सेवा बंद झाली, तर मध्य रेल्वेवरील कुर्ला – सीएसएमटी लोकल बंद झाल्या. लोकल बंद पडल्याने प्रवाशांना पायी चालात जवळचे रेल्वे स्थानक गाठावे लागले. मुसळधार पाऊस आणि करावी लागलेली पायपीट यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईत रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांत मंगळवार सकाळपासून पाणी साचल्याने लोकल ट्रेन सुमारे अर्धातास विलंबाने धावत होत्या. शीव आणि घाटकोपरदरम्यान सकाळी लोकल ट्रेन खोळंबली होती. नंतरही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या. सकाळच्या वेळी प्रवाशांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसला होता. पावसाचा जोर वाढू लागल्याने रुळ पाण्याखाली गेले, तसेच रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले. परिणामी रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला.