कराड : वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणासाठी संवादाचा नवा मार्ग तयार करत, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांच्या वतीने ‘सह्याद्री कट्टा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पहिली बैठक ‘सह्याद्रीतील पक्षी’ (Birds of Sahyadri) या विषयावर सोमवारी कराडच्या कोयना उपसंचालक कार्यालयात पार पडली. बैठकीत संवादातून वनसंवर्धनाचा मार्ग निर्माण होणार असून, त्यातून विविध प्रश्नांचे निरसन होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी या वेळी सह्याद्री परिसरातील पक्ष्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे निरीक्षण, छायाचित्रीकरण (फोटोग्राफी) करताना घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले. पक्षी निरीक्षणाचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय संवेदन यावर त्यांनी उपस्थितांशी संवाद दिलखुलास साधला.

‘सह्याद्री कट्टा’ ही संकल्पना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी पुढे आणली असून, या उपक्रमातून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी वन व पर्यावरण विषयक चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. या चर्चांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, अधिकारी, सामाजिक संस्था व निसर्गप्रेमींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. जनसामान्यांत पर्यावरण व व्याघ्र प्रकल्पाबाबत जागृती निर्माण करणे, संवादातून संरक्षणाचा मार्ग शोधणे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करणे, असे या उपक्रमामागील उद्दिष्ट असल्याचे तुषार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या पहिल्या कार्यक्रमाला उपसंचालक किरण जगताप (कोयना), उपसंचालक स्नेहलता पाटील (चांदोली), सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, संदेश पाटील, अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर आदी मान्यवर, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, सर्पमित्र, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था आणि समूह सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम गोडसे यांनी केले. तर, महेश झांजुर्णे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दरम्यान, वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षणासाठी संवादाचा नवा मार्ग तयार करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘सह्याद्री कट्टा’ या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पर्यावरण व पक्षीप्रेमी आणि सजग नागरिकांना या उपक्रमाचे अप्रूप वाटत असून, असे उपक्रम व कार्यक्रम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.