Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यामध्ये नगरविकास विभाग अपयशी ठरत असल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या चर्चांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ती माहिती धांदात खोटी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता या चर्चांवर पडदा पडल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात नगरविकास विभाग मागे असल्याचं बोललं जात आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, “ती माहिती धांदात खोटी आहे”, असं एका वाक्यात उत्तर देत अजित पवार यांनी या संदर्भातील चर्चा फेटाळून लावल्या.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
दरम्यान, राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २७ ऑगस्टपासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण उत्सुक असून आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “या वर्षी आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजे उद्या (२६ ऑगस्ट) शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा जीआर काढला आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं, तसेच ज्यांना पेन्शन दिली जाते. त्या सर्वांना २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात त्यांचं वेतन जमा होणार आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.