Sushma Andhare on Rupali Chakankar : प्रसिद्धी मिळवण्याकरता विरोधक माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करत आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसिद्धी मिळायला रुपाली चाकणकर कोण आहेत? असा सवालच त्यांनी विचारला आहे. त्या रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात बोलण्याकरता ही भेट घेण्यात आली. भेट झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोण आहेत रुपाली चाकणकर? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? की स्मृती इराणी आहेत? कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रिमो आहेत? राजकारण, बॉलिवूड की प्रशासनातल्या सुप्रिमो आहेत? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळतेय. मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात, त्यांनी या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर यावं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा हवी
“महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा द्या. पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करू शकत नाही. कायद्याचा परीघ माहिती असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हवी. विद्यमान अध्यक्षांना कायद्याची कोणतीही पदवी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही. ईमेल पाठवण्याला त्या सुमोटो म्हणतात”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
राज्यपालांबरोबरच्या बैठकीत काय चर्चा झाली?
१) वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये पोलीस आणि राजकीय वरदहस्त याचा विचार करता हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे तसेच या प्रकरणातील चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजेच पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर तथा त्यांचे सख्खे मेहुणे व खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शशिकांत चव्हाण यांचा या प्रकरणातील अतिरिक्त हस्तक्षेप टाळावा तसेच शशिकांत चव्हाण व जालिंदर सुपेकर यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
२) लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने आर्थिक तरतूद निश्चित करावी मात्र यासाठी सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी कल्याण विभागाचा निधी वळता करू नये. पार्टी महाज्योती सारथी या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळायला हवी.
३) पुणे जिल्ह्यातील विशेषतः लोहगाव विमान नगर विश्रांतवाडी धानोरी या परिसरातील अनाधिकृत पगार यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी पुणे आयुक्तांना सूचना निर्गमित कराव्यात तथा ड्रग्स विरोधी मोहीम अधिक तीव्र व्हावी.
४) राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता या बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या शोध मोहिमेसाठी विशेष कक्ष कार्यान्वित व्हावा.
५) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परिघ अज्ञात असणारी व्यक्ती असावी. आयोगाची रिक्त असणारी सदस्य पदे तात्काळ भरली जावीत. विभागीय कार्यालय सुरू व्हावीत. आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी ओ राजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी.