औरंगाबाद खंडपीठाचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षांच्या मुलाने आपल्याच वयाच्या मुलीस पत्नी म्हणून स्वीकारण्याचे अभिवचन खंडपीठात दिले. त्यावर खंडपीठाने मुलीस मुलासोबत जाण्याची मुभा देताना प्रेमविवाह करणारे मुलगा अन् मुलगी दोघे सज्ञान असल्याने मुलीने कुणासोबत राहायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार असल्याचे मत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. मंगेश पाटील यांनी मांडले आहे.

बीड जिल्ह्यतील अंबाजोगाई येथील शेअर व्यवसायात असलेल्या सव्वीस वर्षीय मुलाचे आणि हिंगोली येथील त्याच्याच वयाच्या मुलीशी मागील पंधरा वर्षांपासून मत्री आहे. आपल्या मत्रीचे रूपांतर त्यांनी लग्नगाठ बांधून नात्यात बांधण्याचे ठरविले. बीड येथे दोघांनी हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे लग्न करण्यासाठी नोंदणी केली. यानंतर मुलगी घरी परतल्यावर तिच्या घरच्यांना मुलीच्या नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या प्रकरणाची माहिती मिळाली. मुलीचे तिच्या आई-वडिलांसोबत वाद झाले. घरच्यांचा दबाब वाढल्यानंतर मुलीवर अनेक बंधने लादण्यात आली. आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्यास घरचे विरोध करीत असल्याने मुलीने सरळ पोलीस ठाणे गाठून घरच्यांविरोधात तक्रार दिली. मुलीच्या संमतीने पोलिसांनी तिला नांदेड येथील महिला वसतिगृहात ठेवले.

दोघांच्या लग्नासंबंधीच्या नोटीसचा कालावधी संपत चालल्याने आणि मुलीस भेटण्यास मज्जाव केला जात असल्याने मुलाने अ‍ॅड. राहुल धसे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. लग्नाची तारीख जवळ येत असून आम्ही स्वखुशीने विवाह करीत आहोत. मुलगी सज्ञान असून तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही. त्यामुळे लग्नासाठी मुलीस पोलीस संरक्षणात बीड येथील विवाह नोंदणी कार्यालयात हजर करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी खंडपीठात हस्तक्षेप अर्ज सादर केला. प्रथम खंडपीठाने याचिकेत नोटीस बाजवल्या. १ ऑक्टोबर रोजी मुलीस खंडपीठात हजर करण्यात आले. खंडपीठाने मुलीसोबत चर्चा केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मुलगी व मुलगा दोघांचे वय २६ असल्याने दोघे आपल्या भविष्याचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत. मुलीला कुठे आणि कुणासोबत राहायचे आहे हे समजण्याइतकी ती सज्ञान आहे असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तिच्या भवितव्यासंबंधीचा निर्णय घेणे हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे, असे सांगून खंडपीठाने याचिका निकाली काढली. मुलाच्या वतीने अ‍ॅड. राहुल धसे तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is right of the girl to live with whom aurangabad bench
First published on: 09-10-2018 at 02:58 IST