अहिल्यानगरः उद्योगांना कौशल्यावर आधारित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण संस्था व उद्योग यांच्या संबंधातून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रांतर्गत विद्यापीठ व उद्योजक यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीची पहिली बैठक एमआयडीसीमध्ये झाली. यावेळी लेखापरीक्षण, औद्योगिक गुणवत्ता, बँकिंग क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उद्योग व शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून असे कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार व्हावेत त्यासाठी हिंद सेवा मंडळाचे संचालक अनंत देसाई यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्याला मूर्त स्वरूप आले आहे. या बैठकीस विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. देविदास गोल्हार, उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सनदी लेखापाल संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पुराणिक व सनित मुथा, प्राचार्य डॉ. उदय नाईक, प्राचार्य माहेश्वरी गावित, उद्योजक राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, सुमित लोढा, विद्यापीठाचे अधीसभा सदस्य अमोल घोलप, उद्योजक अविनाश बोपोर्डीकर, राजेश देशपांडे, दिलीप अकोलकर, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सनदी लेखापाल संघटनेकडे लेखापरीक्षण, आमी संघटना व ऑटो क्लस्टरकडे बीएससी क्वालिटी ॲन्शुरन्स, प्राचार्य डॉ. नाईक यांच्याकडे औद्योगिक अभियांत्रिकी, बँकिंग क्षेत्रासंदर्भात देसाई यांच्याकडे अभ्यासक्रम तयार करण्याच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला. महिन्यापूर्वी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ॲप्रेंटीसशीप अबेडेड डिग्री प्रोग्राम (एइडीपी) अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्याची व यंदापासून प्रत्येक विद्यापीठांत किमान ३०० विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची सूचना राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांना केली आहे. शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ व ‘इंटर्नशिप’ चा लाभ देण्यासह उद्योजकांना कौशल्यावर आधारित मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न समिती करणार आहे.
उद्योगांशी करार, विद्यावेतन
पहिल्या टप्प्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठअंतर्गत पुणे, नाशिक व अहिल्यानगरमधील ५६ स्वायत्त महाविद्यालयातून यंदाच्या वर्षापासून किमान १५ अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाशिवाय किमान एक वर्ष उद्योगांमधून प्रशिक्षण घेता येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांना विद्यावेतनही (स्टायपेंड) मिळेल, यासाठी विद्यापीठ, महाविद्यालय व उद्योगांबरोबर करार केले जाणार आहेत.-डॉ. पराग काळकर, प्रतिनिधी कुलगुरू, विद्यापीठ.
कौशल्यावर आधारित रोजगार निर्मिती
शिक्षण व प्रत्यक्ष प्रशिक्षण यातील दरी कमी करण्यासाठी शैक्षणिक संस्था व उद्योजक यांच्या समन्वयातून कौशल्यावर आधारित मनुष्यबळ तयार व्हावे, यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. अहिल्यानगरमधील उद्योजक, शिक्षण संस्था, व्यावसायिकांच्या संघटनांचा यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.-अनंत देसाई, समन्वयक.