Devendra Fadnavis: सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केले. त्यानंतर ते आवाजी मतदानाने विधानसभेत मंजूरही झाले. पण, फडणवीस यांनी विधेयक सादर केल्यानंतर यावर झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी पीएमएलए कायदा आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे उदाहरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
जनसुरक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “अध्यक्ष महोदय, मी बावनकुळे साहेबांचे अभिनंदन करायला उभा आहे. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन काम केले. आम्ही सूचवलेले बरेचसे बदल त्यांनी केले. आम्ही चर्चेवेळी कायद्यातील काही मुद्दे वगळण्यास सांगितले होते. त्यावर चर्चाही झाली, पण ते वगळले नाहीत. मालमत्ता जप्त करताना वगैरे काही सूचना केल्या होत्या. तीन वर्षांची शिक्षा आणि तीन लाख रुपये दंड याला ‘किंवा’ असे सूचवले होते, पण ते ‘आणि’ तसेच राहिले आहे.”
जयंत पाटील पुढे म्हणाले की, “अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला तोच जर आशय असेल तर महाराष्ट्रातील फोफावलेली नक्षलवादी चळवळ मोडून काढणे आवश्यक आहे. त्याला आमचा पाठिंबाच आहे. आम्ही त्याच्या विरोधातच आहोत. आम्ही त्या खात्याचे मंत्री असताना हेच काम केले आहे. आज नक्षलवादाचं शहरीकरण झाले आहे, असा दावा पोलिसांकडून होत आहे. यामुळे लोकांना भीती आहे की, त्याच्या नावाखाली इतरांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. पोलिसांकडून त्याचा गैरवापर होऊ नये, येवढीच भीती आहे. आपण गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) आहात तोपर्यंत ठीक आहे. पण, तुम्ही नसताना… मी पी. चिदंबरम यांचे उदाहरण देतो. ते केंद्रीय गृहमंत्री असताना पीएमएलए कायदा केला आणि पहिल्यांदा तेच आत गेले. त्यामुळे कायद्यातील तरतुदी व्यवस्थित करा, येवढीच आमची विनंती आहे.” जयंत पाटील यांनी हे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला.
दरम्यान, युपीए सरकारच्या कार्यकाळात पीएमएलए कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीच मांडला होता. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर पी. चिदंबरम यांना याच कायद्यांतर्गत अटक झाली होती.
त्यावेळी युपीए सरकारमध्ये असलेल्या शरद पवार यांनी या कायद्यातील दुरुस्तीचा, सरकार बदलल्यानंतर दुरुपयोग होईल असा इशारा दिला होता. पवार यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत भाष्य केले होते.