Jalgaon Mayuri Suicide Case : पुण्यातील मावळ तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच आता जळगावमध्ये अशीच घटना घडली आहे. येथील सुंदरमोती नगरमधील मुयरी नावाच्या एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तर, मयुरीच्या आईने आरोप केला आहे की “तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ केला होता. या छळाला कंटाळून तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वीच मयुरीचं लग्न झालं होतं.”

मयुरीच्या पालकांनी आरोप केला आहे की “सासरकडच्या लोकांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आईने सांगितलं की दोनच दिवसांपूर्वी तिचा साढदिवस होता. मयुरीच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.”

मयुरीच्या आईचे गंभीर आरोप

मयुरीची आई म्हणाली, “माझ्या लेकीला सासरकडच्या मंडळींनी खूप त्रास दिला. आमच्याकडे आठ ते १० लाख रुपयांची मागणी केली जात होती. मुयरीकडेही पैसे मागितले जात होते. पैसे आणायला तिला माहेरी पाठवण्यात आलं होतं. परंतु, ती रिकाम्या हाती परत गेली. आम्ही तिच्या नवऱ्याला काही पैसे दिले होते. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही तिला चांगली वागणूक देऊ. तरी आमचा घात केला. मयुरी आम्हाला सांगायची की सासरी तिचा खूप छळ केला जात आहे. शेवटी त्या लोकांनी माझ्या लेकीला मारून टाकलं. त्या लोकांनीच तिला गळफास देऊन मारलं. ती मला म्हणायची आई मी तुला मोजकंच सांगेन, सविस्तर सांगणार नाही. नाहीतर तुला त्रास होईल.”

मयुरीच्या आईकडून कारवाईची मागणी

मयुरीची आई म्हणाली, “सासरी मयुरीचा छळ करणाऱ्यांना फाशी व्हायला हवी. तिच्या दिराने तिला खूप त्रास दिला. तिचे सासू-सासरे, नणंद आणि नवरा हे देखील तिचा छळ करायचे. तिच्या नवऱ्याच्या मावशा अधून मधून यायच्या आणि सासू-सासऱ्याचे कान भरून आणखी भर घालायच्या. या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.”

(बातमी अपडेट होत आहे)