आमची मुलं अभ्यास करत नाहीत अशी तक्रार करताना अनेक पालकांना तुम्ही पाहिलं असेल. पण माझे वडील मला अभ्यास करु देत नाहीत अशी तक्रार करणारा मुलगा तुम्ही कधी पाहिला नसेल. पण जळगावात अशी एक घटना समोर आली आहे. येथील एका मुलाची वडील अभ्यास करु देत नसल्याची तक्रार आहे. इतकंच नाही तर या मुलाने ही तक्रार करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठलं. १२ वर्षाच्या या मुलाने पोलिसांकडे जाऊन वडिलांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. मुलाची तक्रार ऐकून पोलीसही गोंधळात पडले होते.

अजय लक्ष्मण कुमावत असं या मुलाचं नाव आहे. अजय आपल्या कुटुंबासोबत जामनेर शहरातील भुसावळ रोड भागात राहतो. त्याला एक भाऊ आणि बहिणदेखील आहे. बुधवारी दुपारी अजयने पोलीस स्टेशन गाठलं आणि वडील रात्री टीव्ही पाहतात, आई आणि आपल्याला मारहाण करतात, अभ्यास करु देत नाहीत अशी तक्रार केली.

एक लहान मुलगा आपल्या वडिलांविरोधात तक्रार करत असल्याचं पाहून पोलीस काही वेळ चक्रावले होते. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अजयची आपुलकीने विचारपूस केली. यानंतर त्यांनी अजयच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून चांगली समज दिली. तसंच कानउघडणीही केली. परिस्थिती बेताची असल्याने प्रताप इंगळे यांनी अजयला शालेय साहित्य, कपडे आणि बूट खरेदी करुन दिले. दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या जामनेरमध्ये चर्चा सुरु आहे.