जालना : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठीमागून लाथ घातल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे.
पोलिस उपअधीक्षक कुलकर्णी यांनी ज्याच्या कमरेत लाथ घातली त्याचे नाव गोपाल चौधरी असून गेले अनेक दिवस कौटुंबिक प्रकरणातील न्यायासाठी त्याचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याची तक्रार करून त्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देणारे पत्र त्याने पोलिसांना दिले होते. शुक्रवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयल करीत करताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यास घेऊन जाताना उपअधीक्षक कुलकर्णी यांनी पाठीमागून धावत येऊन त्याच्या कमरेत लाथ घातल्याचे चित्रफीतीत दिसत आहे. गोपाल चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, आपल्या पत्नीने दुसरे लग्न केले असून याबाबत जालना पोलिसांत तक्रार केली आहे. परंतु पोलीस पत्नीला अटक करून आणण्याऐवजी खोटी आश्वासने देत आहेत. त्यामुळे न्याय मिळत नाही म्हणून आत्मदहन करणार असल्याचे पत्र पोलिसांना दिले होते.
पोलिस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, गोपाल चौधरी याच्या पत्नीने दीड-दोन वर्षापूर्वी अमरावती येथे दुसरे लग्न केलेले आहे. यासंदर्भात कायदेशीर बाजू समजावून सांगूनही नेहमी राष्ट्रीय सणाच्या वेळी ते आंदोलन करतात. त्यांच्यासह वडील आणि त्यांच्या भावास सर्व कायदेशीर बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कदीम जालना पोलीस स्टेशनमधील अंमलदारासोबत वाद घालून झटापट केली.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आत्मदहनाचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यास रोखले. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल पडले त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून गुन्हा नोंदविला आहे.