केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीमधील या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे काश्मीरसंबंधी आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं; मोदींचे आभार – उद्धव ठाकरे

या मुलाखतीत बाळासाहेबांना आपण पंतप्रधान झाल्यास पहिलं काम कोणतं करणार ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तर देताना बाळासाहेब ठाकरे सांगतात की, “सर्वात आधी काश्मीर साफ करणार. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. एकाही दहशतवाद्यावर खटला चालवणार नाही, थेट त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश देईन”.

अमित शाह यांनी राज्यसभेत घोषणा करताना कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील असं सांगितलं. यासोबतच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, “काश्मिरी पंडित जेव्हा त्यांचे घर सोडून पलायन करत होते त्यावेळेला पुर्ण हिंदुस्तानात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांची पाठराखण केली मजबूती दिली आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे असे बाळासाहेबांचे मत होते. मी तमाम शिवसेनेकडून तसेच भारतातल्या आणि जगभरातल्या देशाच्या कट्टर हिंदूंकडून या सरकारचे अभिनंदन करतो”.