Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. पण या चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या. मात्र, यानंतर अखेर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, या मेळाव्यात जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचं भाषण होतं. या भाषणात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांसह विविध विषयांवर मत व्यक्त केलं. यावेळी जयंत पाटील यांनी एका कवितेच्या माध्यमातून आपली भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मुख्य सेनापती होतो, पण सेना अजूनही सज्ज आहे. मी जातोय पण सोडत नाही’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

“मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे, पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्ट मात्र ठाम आहे. कालही मी महाराष्ट्रासाठी होतो आणि आजही आहे. नाव असेल किंवा नसेल, पण कामांतूनच ओळख मिळेल. कारण मी जयंत आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशिकांत शिंदे म्हणाले की, “मला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो की राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक जेष्ठ नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचं १०० टक्के सोनं करण्याचा मी प्रयत्न करण्याचं काम करणार आहे” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.